

कराड : भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात सातारा जिल्ह्यातील पत्री सरकारच्या सशस्त्र संघर्षाला विशेष स्थान आहे. इंग्रजांच्या साम्राज्याला थेट आव्हान देणाऱ्या आणि भूमिगत स्वातंत्र्यसैनिकांच्या धाडसाचे प्रतीक ठरलेल्या कराड तालुक्यातील शेणोली खिंडीतील ब्रिटिशांच्या पगार रेल्वेगाडी लुटीच्या ऐतिहासिक घटनेला यंदा ८३ वर्षे पूर्ण झाली आहेत. ७ जून १९४३ रोजी घडलेल्या या धाडसी कारवाईने इंग्रज सरकारला जबर धक्का दिला होता. या निमित्ताने क्रांतिवीर स्वातंत्र्यसैनिक रामराव पाटील यांचे सुपुत्र प्रकाश पाटील यांनी सहकाऱ्यांसह शेणोली खिंडीतील घटनास्थळी भेट देऊन स्मरणफलक फडकावला आणि या ऐतिहासिक घटनेची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला.
भारताच्या स्वातंत्र्यलढ्याची धग ग्रामीण भागापर्यंत पोहोचली होती. तत्कालीन सातारा जिल्ह्यातील जनतेने क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखालील पत्री सरकारच्या चळवळीला मोठा पाठिंबा दिला होता. भूमिगत राहून अनेक क्रांतिकारक इंग्रजांविरुद्ध घातपाती कारवाया करत होते. मात्र, स्वातंत्र्यलढा अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी निधीची मोठी आवश्यकता होती. शस्त्रास्त्रे खरेदी करणे, भूमिगत कार्यकर्त्यांची व्यवस्था करणे आणि चळवळीला आर्थिक बळ देणे यासाठी इंग्रजांच्या कर्मचाऱ्यांचा पगार घेऊन जाणारी रेल्वेगाडी लुटण्याची योजना आखण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवरील मोहिमेद्वारे शत्रूचा खजिना हस्तगत करून स्वराज्य उभारले, त्याच प्रेरणेतून हा धाडसी निर्णय घेण्यात आला.
या मोहिमेत सहभागी असलेले शेणोली गावचे देशभक्त क्रांतीवीर रामराव पाटील यांनी आपल्या गावाजवळील शेणोली खिंडीची जागा सुचवली. पुणे-मिरज रेल्वेमार्गावरील ही खिंड दोन डोंगरांच्या मधोमध, दाट झाडीने वेढलेली आणि रेल्वेमार्गाला इंग्रजी ‘एस’ आकाराचे वळण असलेली असल्याने कारवाईसाठी अत्यंत अनुकूल होती. ७ जून १९४३ रोजी नियोजनाप्रमाणे रेल्वेगाडी येण्यापूर्वी रेल्वे रुळांवर दगडांचा ढीग टाकण्यात आला. चढाचा रस्ता असल्याने गाडीचा वेग कमी होता. गाडीचालकाच्या लक्षात हा अडथळा येताच त्याने गाडी थांबवली. त्याचवेळी गाडीच्या मागील बाजूसही दगडांची भिंत उभारण्यात आली.
१६ स्वातंत्र्यसैनिकांचा सहभाग
या धाडसी मोहिमेत क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली क्रांतीअग्रणी जी. डी. बापू लाड (कुंडल), क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी (वाळवा), देशभक्त रामराव पाटील (शेणोली) यांच्यासह अन्य १६ स्वातंत्र्यसैनिक सहभागी होते.शेणोली खिंडीतील ही कारवाई केवळ आर्थिक लूट नव्हती, तर ती इंग्रज सत्तेला दिलेले थेट आव्हान होते. या घटनेमुळे पत्री सरकारच्या चळवळीला नवी ऊर्जा मिळाली आणि ग्रामीण भागातील स्वातंत्र्यलढ्याची ताकद देशासमोर अधोरेखित झाली.
स्मृतिस्थळ उभारण्याची मागणी
या ऐतिहासिक घटनेच्या ८३व्या स्मृतिदिनानिमित्त प्रकाश पाटील यांनी घटनास्थळी जाऊन स्मरणफलक फडकावला. यावेळी त्यांनी शासनाने शेणोली खिंड येथे स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ भव्य स्मृतिस्थळ उभारावे, अशी मागणी केली.या ठिकाणी स्मृतिस्थळ उभारल्यास नव्या पिढीला स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास समजेल आणि देशभक्तीची प्रेरणा मिळेल, अशी भावना प्रकाश पाटील यांनी व्यक्त केली.