मुंबई : बेळगावमधील टीएफई सोसायटी संचलित आदर्श बालिका ही ८७ वर्षे जुनी शाळा आहे. या शाळेत १,२०० मुली शिक्षण घेत आहेत. मराठी भाषेचे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी या शाळेची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शाळेच्या पुनर्बांधणीसाठी ८.८० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. याबाबत बुधवारी शासन अध्यादेश जारी करण्यात आला आहे.
८७ वर्षे जुन्या असलेल्या या शाळेच्या पुनर्बांधणीसाठी संस्थेने रुपये ८.८० कोटी निधी मिळण्यासाठी मागणी केली होती. टी.एफ.ई. सोसायटी संचलित आदर्श बालिका आदर्श विद्यालय, बेळगाव या मराठी शाळेच्या पुनर्बांधणीसाठी ८.८० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य पुणे शिक्षण आयुक्त यांच्या माध्यमातून हा निधी खर्च करण्यात येणार आहे.
स्त्री शिक्षण आणि सबलीकरणात शाळेचे योगदान
महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागामध्ये अनेक मराठी शाळा आहेत. बेळगाव येथील टी.एफ.ई. सोसायटी संचलित आदर्श बालिका आदर्श विद्यालय ही शाळा आहे. या शाळेमध्ये १,२०० मुली शिक्षण घेत आहेत. गेली ८७ वर्षे स्त्री शिक्षण आणि सबलीकरण यात शाळेचे मोठे योगदान आहे. शिक्षण महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या शिष्या स्वर्गवासी सुमित्राबाई सोहोनी व कमलाबाई छात्रे यांनी १९३७ साली ही शाळा सुरू केली आहे.