
छत्रपती संभाजीनगर : २०२७ मध्ये नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी जिल्ह्यात विविध सुविधांची निर्मिती करण्यासाठी ८,७१९ कोटी रुपयांचा प्राथमिक आराखडा तयार करण्यात आला आहे. हा आराखडा वेरुळ, घुष्णेश्वर, पैठण या जिल्ह्यातील तीर्थक्षेत्रांवर येणाऱ्या पर्यटकांचा ओघ लक्षात घेऊन बनवण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सर्वसमावेशक नियोजन करण्यावर भर देत सांगितले की, लोकप्रतिनिधी, समाजातील विविध घटक आणि तज्ज्ञ व्यक्तींची मते विचारात घेऊन आराखडा अधिक व्यापक आणि सुक्ष्म नियोजन युक्त असावा. सखोल नियोजन करून आराखडा फेरसादर करावा, असे त्यांनी निर्देशित केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात नाशिक येथे कुंभमेळा विकास आराखड्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील विकासकामांच्या नियोजनाची बैठक पार पडली. या बैठकीला मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते तसेच सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.
पर्यटकांचा ओघ लक्षात घेता महाशिवरात्री पर्वात दररोज १.५ ते २ लाख तर सिंहस्थ पर्वात ३ लाख पर्यटकांची हजेरी अपेक्षित आहे. यामुळे नाशिक, त्र्यंबकेश्वरसह जवळच्या तीर्थक्षेत्रांमध्ये तसेच छत्रपती संभाजीनगर, शिर्डी विमानतळे वापरून देश-विदेशातून पर्यटक आकर्षित होतील. याशिवाय अजिंठा, वेरुळ, पितळखोरा लेणी, घटोत्कच लेणी, दौलताबाद किल्ला, बिबी का मकबरा, नहेर ए अंबरी, पाणचक्की, जायकवाडी धरण, गौताळा अभयारण्य यांसारख्या महत्वाच्या स्थळांकडेही पर्यटकांचा प्रवास वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.