
पुणे : पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगावजवळ भीषण अपघातात नऊ जण ठार झाले असून त्यामध्ये चार महिला, चार पुरुष आणि एका बाळाचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तत्काळ खासगी आणि शासकीय रुग्णालयात दाखल केले. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगावजवळ शुक्रवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅक्स ऑटो गाडीला पाठीमागून आयशर टेम्पोने जोरदार धडक दिली. यामुळे मॅक्स ऑटो ही चेंडूप्रमाणे हवेत फेकली गेली आणि पुढे एक ब्रेक फेल झालेली एसटी रस्त्याच्या बाजूला उभी होती. त्या एसटीवर जाऊन मॅक्स ऑटो आदळली. या अपघातात आयशर आणि मॅक्स ऑटोचा अक्षरशः चुराडा झाला आहे.
या भीषण अपघातात चार महिला, चार पुरुष आणि एका बाळाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर तीन जण जखमी झाले आहेत. अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.
पाच लाखांची मदत
दरम्यान, या अपघातानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या वारसांना मदतीची घोषणा केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगावजवळ झालेल्या भीषण अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मृतांच्या वारसांना ५ लाख रुपये आर्थिक सहाय्य मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून करण्यात येईल. तसेच जखमींच्या उपचाराची योग्य काळजी घेण्याच्या सूचना पुणे पोलीस अधीक्षकांना दिल्या आहेत, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
जेजुरीतील अपघातात तिघांचा जागीच मृत्यू
आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गावर बेलसर फाटाजवळ एसटी बस व दुचाकीच्या झालेल्या भीषण अपघातात गुरुवारी दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. रमेश किसन मेमाणे (६०), संतोष दत्तात्रय मेमाणे (४०) व पांडुरंग दामोदर मेमाणे (६५) अशी या तिघांची नावे असून ते तिघेही बोरमाळ वस्ती, पारगाव मेमाणे, ता. पुरंदर जि. पुणे, येथील रहिवासी आहेत.
सासवड-जेजुरी रस्त्यावर (पालखी महामार्ग) बेलसर फाटा परिसरात उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. दुचाकीवर असणारे तिघेजण रस्ता ओलांडून जात होते. त्यावेळी एसटी बसने या तिघांना जोरदार धडक दिली. दरम्यान, एसटीचालकाने गाडीचा वेग कमी करून बस रस्त्याच्या खाली घेण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, दुचाकी बसखाली गेल्याने ती लांबपर्यंत फरफटत गेली. या अपघातात दुचाकीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यांना तातडीने जेजुरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. एकाच वस्तीवरील तिघांचा या अपघातात मृत्यू झाल्यामुळे पारगाव मेमाणे गावावर शोककळा पसरली आहे.