कराडमध्ये स्फोटात ९ गंभीर जखमी ७ घरांसह ६ दुचाकीचे लाखोंचे नुकसान

घराची भिंत सुमारे २५ फूट वर उडून समोरील घराच्या पत्र्यावर पडली
कराडमध्ये स्फोटात ९ गंभीर जखमी ७ घरांसह ६ दुचाकीचे लाखोंचे नुकसान

कराड : शहरातील मुजावर कॉलनीतील शांतीनगर येथे बुधवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास शरीफ मुल्ला यांच्या घरात भीषण स्फोट झाला. यात घराची भिंत सुमारे २५ फूट वर उडून समोरील घराच्या पत्र्यावर पडली. या भीषण स्फोटात शरीफ मुबारक मुल्ला (३५) यांच्या कुटूंबातील ४ जणांसह पवार कुटुंबातील ५ जण असे ९ जण गंभीर जखमी झाले आहेत. हा स्फोट एवढा जबरदस्त व शक्तिशाली होता की ७ घराच्या भिंतींचीही पडझड झाली असून घर धोकादायक बनली आहेत. या स्फोटामुळे ६ दुचाकी गाड्यांचेही नुकसान झाले तर सारा परिसर हादरला. स्फोटाचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी घरातील स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.

शहरातील मुजावर कॉलनीतील शांतीनगर येथे शरीफ मुल्ला कुटूंबासह राहतात. बुधवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरात अचानक स्फोट झाला. मुल्ला कुटूंबियांना बचावासाठी घरातून बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. त्यामुळे स्फोटात मुल्ला कुटूंबातील शरीफ मुबारक मुल्ला (३५), राहत शरीफ मुल्ला ( ७), जोया शरीफ मुल्ला (१०), सुलताना शरीफ मुल्ला (३२) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कृष्णा रूग्णालयात उपचार सुरू आहेत तर शेजारील घरातील अशोक दिनकर पवार (५४), सुनीता अशोक पवार (४५), दत्तात्रय बंडू खिलारे (८०) जखमी झाले आहेत. या भीषण स्फोटामुळे शरीफ मुल्ला,अशोक पवार यांच्यासह साईनाथ डवरी, रफीक बागवान यांच्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे तर अस्लम पठाण व आनंदा वारे यांच्याही घरांना या घटनेत फटका बसला आहे. स्फोटाचा आवाज एवढा भीषण होता की संपूर्ण मुजावर कॉलनी परिसर हादरून गेला.

फॉरेन्सिक पथकाकडूनही पाहणी

शहरातील मुजावर कॉलनी येथे बुधवारी सकाळी झालेल्या स्फोटबाबत वेगवेगळे तर्क लढवले जात असताना या ठिकाणचा स्फोट हा गॅस लिकेज झाल्यामुळेच झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवला जात आहे. मात्र,अद्याप पूर्ण खात्री नसल्याने पुण्यातील फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले आहे. या स्फोटाची सत्य माहिती समोर येण्यासाठी सखोल चौकशीची गरज आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in