एकाच व्यक्तीच्या खात्यातून ९०० कोटींचा व्यवहार; भाजप आमदार सुरेश धस यांचा गौप्यस्फोट

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर बीड जिल्ह्यातील खळबळजनक घटनांचे नवनवीन खुलासे बाहेर येत आहेत.
आमदार सुरेश धस
आमदार सुरेश धससोशल मीडिया
Published on

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर बीड जिल्ह्यातील खळबळजनक घटनांचे नवनवीन खुलासे बाहेर येत आहेत. त्यातच आता भाजप आमदार सुरेश धस यांनी बीडच्या टेंभुर्णी गावातील एका व्यक्तीच्या नावावर ९०० कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचा खळबळजनक दावा केला. तसेच या आर्थिक व्यवहारांच्या चौकशीची मागणीही त्यांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन केली आहे.

“महादेव बेटिंग ॲपच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात मोठे आर्थिक व्यवहार झाले आहेत. एकाच व्यक्तीच्या नावावर एवढ्या मोठ्या प्रमाणात व्यवहार होतात, याची संबंधित यंत्रणांनी तपासणी केली पाहिजे. साधारणत: १०० कोटी रुपयांपेक्षा अधिकचे व्यवहार असल्यास ईडीकडून चौकशी होते. इथे ९०० कोटी रुपयांचे प्रकरण आहे. त्यामुळे त्याची ईडी चौकशी व्हायला हवी होती. या प्रकरणात दोन पोलीस अधिकारी होते. त्यांची नावे मी पोलीस अधीक्षकांना सांगितली आहेत. या प्रकरणात आणखी लोकांचा सहभाग असण्याची दाट शक्यता आहे”, असे धस म्हणाले. एकाच व्यक्तीच्या खात्यातून

परळीजवळ शिरसाळा गावात गायरान जमिनीवर कब्जा करून गाळे बांधले गेले आहेत. शिरसाळ्यात ६०० वीटभट्ट्या चालतात, त्यातील ३०० अवैध आहेत. गायरान जमिनीवरील बंजारा आणि पारधी समाजातील लोकांची घरे असताना पोलिसांनामार्फत त्यांना हाकलवण्यात आले आणि गायरान जमिनीवर कब्जा केला आहे. गायरान जमिनीवर कब्जा करायचा, हाच परळी पॅटर्न आहे. परळीमध्ये तर राखेचे माफिया मोठ्या प्रमाणात आहेत. याद्वारे कोट्यवधीची उलाढाल होते, असा आरोपही सुरेश धस यांनी केला.

सर्व घटनांमागे ‘आका’चा हात

बीडमध्ये ‘गँग ऑफ वासेपूर’ झाले आहे. बीडजवळ कोणी जमिनी घेतल्या त्याचे तपशील पुढे येत आहेत. बीड जिल्ह्यातील कोणतेही प्रकरण घ्या, कुठल्याही घटना घ्या, त्याच्या मागे एकच ‘आका’ असतो. या आकाच्या नावावर जिल्ह्यात किती जमिनी आहेत, ते एकदा तपासा.

धनंजय मुंडेंवर अप्रत्यक्ष निशाणा

“महादेव ॲपच्या माध्यमातून हा घोटाळा झाला असून याची लिंक थेट मलेशियापर्यंत आहे. बीडमधून चांगल्या अधिकाऱ्यांना बाहेर काढण्यात आले आणि त्यांच्या मर्जीतल्या अधिकाऱ्यांना आणून भ्रष्टाचार करण्यात आला,” असे सांगत धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.

धनंजय मुंडेंचे राजकारण संपवण्याची सुपारी - मिटकरी

भाजप आमदार सुरेश धस यांनी मस्साजोग प्रकरणात धनंजय मुंडे यांचे राजकारण संपवण्याची सुपारी घेतल्याचा आरोप अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. “केवळ पंकजाताई व धनंजय मुंडे हे दोघे बहीण-भाऊ एकत्र आल्याने महायुतीचे व विरोधातील आमदार एकत्र येऊन आमदार सुरेश धस यांच्या माध्यमातून जाणीवपूर्वक धनंजय मुंडे यांच्या राजकीय कारकीर्दीला संपवण्याचे पद्धतशीर प्रयत्न करत आहेत. त्यासाठी एक सामाजिक कार्यकर्त्या कामाला लावल्या आहेत,” अशी टीका मिटकरी यांनी केली

माझ्या नादी लागू नको - धस

अमोल मिटकरी तू लहान आहेस. तू कोणाच्या नादी लागतोय? या रगेलच्या नादी लागू नको. तुझे लय अवघड होईल, आता मी एकदा त्याचे ऐकून घेतो. वडीलकीच्या नात्याने त्याला एकदा समज देतो. तुझे कुणाकडेही दुकान चालव, पण माझ्याकडे दुकान चालवू नको, अशा शब्दांत सुरेश धस यांनी मिटकरींना सुनावले.

logo
marathi.freepressjournal.in