कर्मचाऱ्यांची ९४७ कोटींची थकबाकी एसटी महामंडळाकडे

एसटी कर्मचाऱ्यांना जुलै २०१८ पासून डिसेंबर २०२३ पर्यंत एकूण ६४ महिन्यांचा महागाई भत्त्याची थकबाकी प्रलंबित आहे.
कर्मचाऱ्यांची ९४७ कोटींची थकबाकी एसटी महामंडळाकडे

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढीचा दर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे देण्याची तरतूद आहे. परंतु महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी जाहीर केल्याप्रमाणे महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढीचा दर लागू न केल्यामुळे संचित थकबाकी सुमारे ९४७ कोटी रुपये झाली आहे. त्यामुळे महागाई भत्ता ४६ टक्के देऊन विविध संचित थकबाकीच्या रकमा तात्काळ एसटी कर्मचाऱ्यांना देण्याची मागणी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेच्या वतीने उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्यासह शासनस्तरावर केली आहे.

महाराष्ट्र शासन निर्णयानुसार १ जुलै, २०२३ पासून महागाई भत्याचा दर ४२ टक्क्यांवरून ४६ टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. परंतु सध्या एसटी कर्मचाऱ्यांना ४२ टक्क्यांप्रमाणेच महागाई भत्ता अदा करण्यात येत आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असून आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. एसटी कर्मचाऱ्यांना जुलै २०१८ पासून डिसेंबर २०२३ पर्यंत एकूण ६४ महिन्यांचा महागाई भत्त्याची थकबाकी प्रलंबित आहे. तसेच शासकीय कर्मचारी व एसटी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या महागाई भत्त्याच्या टक्क्यातील ८४ टक्के फरक देणे बाकी आहे.

logo
marathi.freepressjournal.in