

पुणे : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण झाली असून सातारा नगरी सारस्वत आणि साहित्यप्रेमींच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. तब्बल ३३ वर्षांनंतर साताऱ्यात साहित्यिकांचा भव्य मेळा उभा राहणार असल्याने स्थानिक नागरिक आणि साहित्य रसिक उत्सुकतेने या सोहळ्यासाठी वाट पाहत आहेत. आज संध्याकाळी ८.३० वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.
संमेलन १ ते ४ जानेवारी २०२६ या कालावधीत शाहू स्टेडियम, सातारा येथे आयोजित करण्यात आले असून, अध्यक्षतेची सूत्रे ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांनी सांभाळली आहेत. संमेलनात मुख्य मंडपासह ग्रंथ प्रदर्शन, कवी-गझल कट्टा आणि विविध साहित्यिक उपक्रम राबविण्यासाठी स्वतंत्र मंडप आणि तीन सभागृहांची व्यवस्था करण्यात आली आहे. साताऱ्यातील हे संमेलन मराठी साहित्याच्या शतकप्रवाहात एक ऐतिहासिक टप्पा ठरणार असून, साहित्य रसिक आणि स्थानिक नागरिक यांच्यासाठी उत्साहवर्धक ठरणार आहे.
वैशिष्ट्यपूर्ण व्यवस्था
मुख्य मंडपाची आसन क्षमता सुमारे १०,०००, ग्रंथप्रदर्शनासाठी २५ जर्मन हँगरचे गाळे उभारण्यात आले आहेत. संमेलन स्थळ सातारा बस स्थानकापासून पायी चालत जाऊ शकण्याजोग्या अंतरावर असल्यामुळे बाहेरून येणाऱ्या साहित्यरसिकांना सहज प्रवेश मिळेल. वाहनतळ, आरोग्य, स्वच्छता, विद्युत आणि अग्निशमन यांसाठी विशेष व्यवस्थापन केले गेले आहे.
"आयार्च अत्रे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि यशवंतराव चव्हाण यांनी वापरलेली मराठी भाषा पाहिली तर त्या भाषेचा आकार, उकार, गंध आणि सुगंध वेगळा आहे. कारण त्यांनी मायमराठीवर मनापासून प्रेम केले होते. हरियाणामध्ये गत काही वर्षांपासून एक गाव, एक ग्रंथालय अशी चळवळ सुरू आहे. मात्र, महाराष्ट्रात ग्रंथालय चळवळीला आणि ग्रंथालयांना घरघर लागली असून ही खेदाची बाब आहे. ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांना रोजगार हमीतील मजुरांपेक्षा कमी पगार मिळतो, हे खेदजनक आहे" : विश्वास पाटील, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
"साताऱ्याच्या नावलौकिकाला साजेशे असे संमेलन होईल." - छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, स्वागताध्यक्ष
"यंदाचे शतकपूर्व संमेलन गुणवत्तेची उंची गाठत अनोखे ठरेल." - प्रा. मिलिंद जोशी, अध्यक्ष, अ. भा. मराठी साहित्य महामंडळ
"साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखा आणि मावळा फौंडेशनला शतकपूर्व संमेलन आयोजित करण्याचा मान मिळाल्याने संमेलन वैशिष्ट्यपूर्ण आणि लक्षवेधी होईल." - विनोद कुलकर्णी, कार्याध्यक्ष