अलिबाग किनाऱ्याला उधाणापासून सुरक्षाकवच, ४०० मीटर लांबीचा धूप प्रतिबंधात्मक दगडी बंधारा बांधणार; पाच कोटींचा निधी मंजूर

उधाणाच्या उंच उंच लाटांमुळे अलिबाग समुद्रकिनाऱ्यालगतचा बंधारा नादुरुस्त झाला आहे. त्याची दुरुस्ती आणि किनाऱ्यालगत संरक्षण भिंतीसाठी पाच कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली आहे.
अलिबाग किनाऱ्याला उधाणापासून सुरक्षाकवच, ४०० मीटर लांबीचा धूप प्रतिबंधात्मक दगडी बंधारा बांधणार; पाच कोटींचा निधी मंजूर

अलिबाग : उधाणाच्या उंच उंच लाटांमुळे अलिबाग समुद्रकिनाऱ्यालगतचा बंधारा नादुरुस्त झाला आहे. त्याची दुरुस्ती आणि किनाऱ्यालगत संरक्षण भिंतीसाठी पाच कोटींच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. दगडांपासून ४०० मीटर लांबीचा धूप प्रतिबंधात्मक बंधारा पतन विभागाकडून बांधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वीच बंधाऱ्याला सीआरझेडची परवानगी मिळाली आहे. यापूर्वी बांधलेला गॅबियन पद्धतीचा बंधारा नादुरुस्त झाला आहे. अनेक ठिकाणी जाळीचे वेष्टन तुटल्याने बंधारा ठिकठिकाणी खचला आहे. परिणामी दरवर्षी पावसाळ्यात अलिबाग कोळीवाड्यात पाणी शिरून मोठे नुकसान होते.

उधाणाचे पाणी मासळी सुकवण्याच्या खळ्यातही जात असल्याने मासळी सुकवण्याची कायम गैरसोय व्हायची. शिवाय कोळीवाड्यातील घरातही पाणी शिरल्याने घरे कमकुवत झाली आहेत. अलिबाग समुद्रकिनारीही उधाण लाटांमुळे बंधाऱ्याला मोठी भेग पडल्याने पर्यटकांचीही गैरसोय होत होती.

वायशेत, मापगावातील खाणीतील दगडांचा वापर

नव्याने बांधण्यात येणाऱ्या बंधाऱ्यासाठी वायशेत आणि मापगाव येथील दगडखाणीतून दगड आणले जाणार आहेत. मोठे दगड उधाणाच्या लाटांमध्येही तग धरू शकणारे आहेत. या बंधाऱ्याचा आराखडा पुणे येथील सीडब्ल्यूपीआरएस या संस्थेकडून निश्चित करण्यात आला आहे.

सीआरझेडची परवानगी आल्याने बंधाऱ्याच्या कामातील अडथळा दूर झाला आहे. पूर्वीचे जाळीचे वेष्टन तुटल्याने वेष्टनातील लहान दगड उधाणाच्या लाटांमुळे बाहेर येऊ लागली आहेत. जाळीचा वापर पुन्हा न करता मोठे दगड वापरले जातील, ते उधाणाचे पाणी थोपवण्यास सक्षम आहेत.

- कल्पेश सावंत, सहाय्यक अभियंता, पतन विभाग, अलिबाग

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in