राज्याच्या राजकीय परंपरेला काळिमा- विजय वडेट्टीवार

छत्रपती शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकरांचा आणि संतमहात्म्यांचा महाराष्ट्र, अशी आपल्या राज्याची ओळख आहे.
राज्याच्या राजकीय परंपरेला काळिमा- विजय वडेट्टीवार
Published on

प्रतिनिधी/मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकरांचा आणि संतमहात्म्यांचा महाराष्ट्र, अशी आपल्या राज्याची ओळख आहे. परंतु गेल्या दोन वर्षांत घोटाळेबाजांचा, वसुलीचा, खोकेबाजांचा, पक्ष फोडाफोडीचा, गुंडांना राजाश्रय देणारा महाराष्ट्र अशी राज्याची नवी ओळख करण्यात शिंदे सरकारने मोठी प्रगती केली आहे. त्याचबरोबर भाजप आमदाराने पोलीस ठाण्यात केलेल्या गोळीबारामुळे आणि मुख्यमंत्र्यांवर केलेल्या गंभीर आरोपांमुळे सुसंस्कृत महाराष्ट्राची मान शरमेने खाली गेली असून राज्याच्या आदर्श राजकीय परंपरेला काळिमा फासला आहे, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी येथे केली.

भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात केलेला गोळीबार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या मुलांसोबाबत गुंडांनी छायाचित्र काढणे आदी मुद्द्यांवरून वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात शिवसेना (शिंदे गट) शहर प्रमुखावर गोळीबार केला. यानंतर गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांच्या काळात गुन्हेगारी वाढत आहे. भ्रष्टाचार बोकाळला असल्याचा आरोप केला. या आरोपांना मुख्यमंत्र्यांच्या पुत्राने पुष्टी दिली. कुख्यात गुंड हेमंत दाभेकरने चक्क वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्र्यांच्या पुत्राची भेट घेतली. याचा अर्थ महाराष्ट्रात गुंडाराज सुरू आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.

याच मुख्यमंत्र्यांच्या काळात वर्षा निवासस्थानावर ड्रग प्रकरणातील आरोपीने गणपतीची आरती केली होती. वर्षा निवासस्थान हे गुंडांचे आश्रयस्थान झाले आहे का? हा खरा प्रश्न आहे. या अगोदर शिंदे गटातील आमदार पुत्राने बिल्डरचे अपहरण करून बंदुकीचा धाक दाखवत मारहाण केली होती. उपमुख्यमंत्र्यांच्या पुत्राने गंभीर आरोप असलेल्या गजा मारणेची भेट घेतली होती. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची मुलं गुंडांची पक्षात भरती करत आहेत. महाराष्ट्राला हे इजा-बिजा-तिजा उद‌्ध्वस्त करायला निघाले आहेत, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

logo
marathi.freepressjournal.in