मिरची तोडणाऱ्या मजुरांची नाव वैनगंगा नदीत उलटली; सहा महिला बुडाल्या, शोधकार्य सुरु

यावेळी नावाड्याने पोहता येत असल्याने त्याने एका महिलेला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र....
File photo
File photo

गडचिरोली जिल्ह्यातील चार्मोशी तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वैनगंगा नदीत मजुरांना घेऊन जाणारी नाव उलटली. यात सहा महिला बेपत्ता झाल्या असून त्यांना शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. यातील एका महिलाचा मृतदेह सापडला आहे. तर, इतर महिलांचा शोध सुरु आहे.

मिरची तोडणीसाठी वैनगंगा नदीपलिकडील शेतात सहा महिलांना घेऊन नाव निघाली होती. यावेळी खोल पाण्यात अचानक ही नाव उलटली आणि सर्व महिला पाण्यात पडल्या. यावेळी नावाड्याने पोहता येत असल्याने एका महिलेला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात तो अपयशी ठरल्याने त्याने पोहून किनारा गाठला आणि स्थानिकांना या घटनेची माहिती दिली.

ही घटना गणपूर(रै.) या गावाजवळ घडली असून गावकऱ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली आहे. पोलिसांकडून महिलांचे शोधकार्य सुरु आहे. नदीवरुन पुल नसल्याने किंवा जाण्यासाठी दुसरी कोणतीही पर्यायी व्यवस्था नसल्याने या ठिकाणच्या रहिवाशांना हा जीवघेणा प्रवास करावा लागतो. आज हा प्रवास या महिलांच्या जीवावर बेतला आहे.

logo
marathi.freepressjournal.in