"विकसित भारताची संकल्पना अधोरेखित करणारा अर्थसंकल्प", फडणवीसांनी मानले अर्थमंत्र्यासह पंतप्रधान मोदींचे आभार

चाळी आणि झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या गरीब, मध्यमवर्गीय लोकांना स्वतःचे घर मिळावे यासाठी योजना तयार केली जाईल. तरुणांसाठी 1 लाख कोटींचा व्याजमुक्त निधी निर्माण करण्याचा निर्णय अत्यंत...
"विकसित भारताची संकल्पना अधोरेखित करणारा अर्थसंकल्प", फडणवीसांनी मानले अर्थमंत्र्यासह पंतप्रधान मोदींचे आभार

आज संसदेत देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मांडलेला अंतरिम अर्थसंकल्प हा "विकसित भारताची संकल्पना अधोरेखित करणारा अर्थसंकल्प", असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्र्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

महिला, शेतकरी, गरीब, तरुणांसह मध्यमवर्गीयांवर विशेष लक्ष-

या अंतरिम अर्थसंकल्पात अशा सर्व घटकांवर विशेषत: महिला, शेतकरी, गरीब, तरुण आणि मध्यमवर्गीयांवर विशेष लक्ष देण्यात आले आहे. 1 कोटी कुटुंबांना सोलर सिस्टीम आणि 300 युनिटपर्यंत मोफत वीज उपलब्ध करून देण्याची संकल्पना करण्यात आली आहे", असे फडणवीस यांनी म्हटले आहे. त्यांनी त्यांच्या 'एक्स'हॅडलवर याबाबत पोस्ट केली आहे.

क्रांतिकारी निर्णय-

"चाळी आणि झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या गरीब, मध्यमवर्गीय लोकांना स्वतःचे घर मिळावे यासाठी योजना तयार केली जाईल. तरुणांसाठी 1 लाख कोटींचा व्याजमुक्त निधी निर्माण करण्याचा निर्णय अत्यंत क्रांतिकारी आहे. यामुळे आपले तरुण मोठ्या प्रमाणात उद्योजक बनतील. यामुळे संशोधन आणि स्टार्टअप इकोसिस्टमला मोठी चालना मिळेल", असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

विकासाला मोठी चालना मिळणार-

या अर्थसंकल्पात 'लखपती दीदी' कार्यक्रमाद्वारे 3 कोटी भगिनींना करोडपती बनवण्याचा संकल्पही करण्यात आला आहे. तसेच, महिला बचत गटांच्या माध्यमातून 9 कोटी महिलांना अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. रस्ते, रेल्वे आणि पायाभूत सुविधांवर 11 लाख कोटींची गुंतवणूक केली जात आहे. त्यामुळे विकासाला मोठी चालना मिळणार आहे. या गुंतवणुकीमुळे एकीकडे पायाभूत सुविधा निर्माण होणार असतानाच रोजगारही वाढणार असल्याचे फडणवीस यांनी म्हटले.

आत्मविश्वास वाढवणारा अर्थसंकल्प-

नॅनो डीएपी ही संकल्पना शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. या अंतरिम अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या मालाचे भाव सुधारून ते थेट बाजारपेठेशी जोडण्यासाठी विविध योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. हा अंतरिम अर्थसंकल्प म्हणजे विकासाची दिशा स्पष्ट करणारा अर्थसंकल्प असून त्याच बरोबर या अर्थसंकल्पात आर्थिक समतोलही राखण्यात आला असल्याचे ते म्हणाले. हा संपूर्ण अर्थसंकल्प विकसित भारताचा रोडमॅप तयार करेल, हा अर्थसंकल्प आत्मविश्वास वाढवणारा अर्थसंकल्प आहे!, असेही फडणवीस म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in