
मुंबई पोलिसांनी आज मंगळवार (२७ जून) रोजी शिवसेना (उबाठा) नेते आणि माजी परिवहन मंत्री अनिल परब आणि इतरांवर गुन्हा दाखल केला आहे. शिवसेनेची ४० वर्षापासूनची वांद्रे पूर्व येथील शाखा पाडण्याचं नेतृत्व करणाऱ्या अभियंत्याला मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणात ठाकरे गटाच्या चार कार्यकर्त्यांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. तसंच १५ हून अधिक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक केलेल्या चौघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
बीएमसीकडून तब्बल ४० वर्षे जुन्या असलेल्या वांद्रे पूर्व येथील शिवसेना (ठाकरे गट) शाखेवर कारवाईचा बडगा उगारत शाखा जमीनजोस्त केली. ही शाखा अनधिकृत असल्याचं मुंबई मनपाकडून सांगण्यात आलं आहे. दुसरीकडे शाखा पाडण्याचं काम सुरु असताना शाखेतील छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा काढण्याची विंनंती कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. मात्र, ती डावलून महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी शाखा पाडण्याचं काम सुरु ठेवलं. यानंतर शिवसैनिकांना आक्रमक पवित्रा घेतला.
या घटनेनंतर आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी माजी मंत्री अनिल परब यांच्या नेतृत्वात मोच्या काढला. यावेळी पालिकेच्या सहाययाक अभियंत्याला मारहाण झाली. याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी 'बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनीअर्स असोसिएशन' कडून करण्यात आली होती. यामुळे या प्रकरणात आमदार अनिल परब यांच्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर चार जणांना अटक करुन त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.