कराड : सातारा शहरातील फर्म हॉटेल येथे साखरपुड्याचा कार्यक्रम होऊन त्या कार्यक्रमांसाठी ९ लाख ६३ हजार रुपये खर्च करूनही तो मी नव्हेचचा पवित्रा घेत साखरपुड्याचा कार्यक्रम झाल्यानंतर साताऱ्यातील डॉक्टर मुलाने डॉक्टर मुलीशी लग्न करण्यास नकार दिल्यावरून त्या डॉक्टरवर आणि त्यांच्या आई,वडिलांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.डॉ. गिरीश कदम, त्यांचे वडील बाळकृष्ण कदम,त्यांची आई शिला बाळकृष्ण कदम अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
सातारा शहरातील शाहुनगर येथील टेलिफोन ऑफिसजवळ रहात असलेले डॉ.गिरीश बाळकृष्ण कदम यांच्यासोबत एका डॉक्टर मुलीचा विवाह ठरला होता. त्यानंतर साखरपुड्याचा कार्यक्रमाचेही नियोजन १४ नोव्हेंबर २०२१ ते २४ एप्रिल २०२२ या दरम्यान साताऱ्यातील हॉटेल फर्न येथे करण्यात येऊन कार्यक्रमांसाठी ९ लाख ६३ हजार रुपये खर्च करण्यात आले होते.डॉक्टर मुलीचा आणि त्या मुलीच्या वडिलांचा विश्वास संपादन करुन अगोदर डॉ.गिरीश कदम,त्यांचे वडील बाळकृष्ण कदम, त्यांची आई शिला बाळकृष्ण कदम यांनी हा कार्यक्रम हॉटेल फर्न येथे घेण्याची गळ घातली होती. त्याचा सर्व खर्च त्या डॉक्टर मुलीच्या वडीलांनी केला होता.
दरम्यान, एवढे करूनही डॉ. गिरीश कदम यांनी मुलीशी लग्न न करता फसवणूक केली. समाजात बदनामी केली. आर्थिक नुकसान केले.त्यावरुन तिघांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, याचा तपास शहर पोलीस स्टेशनचे पोलीस करत आहेत.