महाराष्ट्रात धार्मिक हिंसाचार, एकतर्फी प्रेम प्रकरणातून होणारे हल्ले तसंच जीवे मारण्याच्या देण्यात येणाऱ्या धमक्या या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. काही दिवसांपूर्वी देशातील महत्वाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि ठाकरे गटाचे मुख्यप्रवक्ते, खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने राज्यातील राजकारणात खळबळ उडाली होती. यानंतर तपास यंत्रणांनी याप्रकरणाची तात्काळ दखल घेत छळा लावला होता.
आता राज्यातल्या आणखी एका नेत्याला जीवे मारण्याची धमकी आली आहे. व्हॉट्स अॅपवर ही धमकी मिळाली असून मुंबईतील कुलाबा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरु केला आहे. समाजवादी पक्षाचे नेते आणि महाराष्ट्रातील सपाचे अध्यक्ष, आमदार अबू आझमी यांनी ही धमकी देण्यात आली आहे. अबू आझमी यांना यापूर्वी देखील जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत.
दरम्यान, राज्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. पुण्यातील सदाशिव पेठेत अत्यंत वरदळीच्या ठिकाणी एका २० वर्षीय तरुणीवर एकतर्फी प्रेमातून कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची घटना नुकतीचं घडली. तसंच एमपीएससी परिक्षेत राज्यात तिसरी आलेल्या दर्शना पवार हत्यांकांडाने संपूर्ण देश हादरुन निघाला आहे. त्यामुळे गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक राहीला नाही का? असा सवाल देखील उपस्थित होत आहे.