
नवी दिल्ली : महाराष्ट्रात ‘जीबीएस’ आजाराने एका रुग्णाचा बळी गेला असून पुण्यात या आजाराचे १०० हून अधिक रुग्ण आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने या ‘जीबीएस’ आजाराच्या चौकशीसाठी सात तज्ज्ञ सदस्यांची उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. ही समिती या आजाराचे निवारण करण्यासाठी राज्याला मदत करणार आहे.
पुण्यात १०० हून अधिक रुग्णांना हा आजार झाला आहे. या आजारात प्रतिकारशक्ती कमी झाल्याने मज्जातंतूवर परिणाम होतो.
पुण्याहून आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने सोलापूरच्या व्यक्तीला ‘जीबीएस’ आजाराची लागण झाली. त्यात त्याचा मृत्यू झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पुण्यात ‘जीबीएस’ रुग्णांची संख्या १०१ वर गेली आहे. यात ६८ पुरुष व ३३ महिला आहेत. त्यातील १६ रुग्ण व्हेंटीलेटरवर आहेत.
दरम्यान, रॅपिड रिस्पॉन्स टीम व पुणे मनपाच्या आरोग्य विभागाने सिंहगड रोड परिसरात सातत्याने नजर ठेवली आहे. याच विभागात या आजाराच्या रुग्णांची संख्या अधिक आहे.
या आजाराचे निवारण करण्यासाठी राज्य सरकारला मदत म्हणून केंद्राने सात तज्ज्ञांची उच्च स्तरीय समिती स्थापन केली.
लक्षणे काय?
‘जीबीएस’ आजारात अचानक बधीरपणा येतो. तसेच स्नायू कमकुवत होतात. ज्यात हात, पाय कमकुवत होतात. हालचाल मंदावते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, जीवाणू आणि विषाणूजन्य संसर्ग यामुळे ‘जीबीएस’ आजार होतो. हे रुग्णांची प्रतिकारशक्ती कमकुवत करतात. हा आजार लहान मुले व सर्व वयोगटातील व्यक्तींना होऊ शकतो. पण हा साथीचा आजार नाही. तसेच या आजारातून अनेक जण ठणठणीत बरे झाले आहेत.
सोलापुरात आजाराचा पहिला बळी
सोलापुरातील एका व्यक्ती कामानिमित्त पुण्याला आली होती. तेथे ‘जीबीएस’ आजार झालेल्या रुग्णाकडून त्याला संसर्ग झाला. काही दिवसांनी त्याला श्वसनाचा त्रास होऊन अशक्तपणा जाणवू लागला. त्याला १८ जानेवारीला सोलापूरच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याला व्हेंटीलेटरवर ठेवले होते. तेथेच रविवारी त्याचा मृत्यू झाला, असे सोलापूर सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी सांगितले. या मृत रुग्णाच्या रक्ताचे नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेला तपासासाठी पाठवले आहे.