"कावळ्याच्या शापानी गाय मरत नसते", जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांना खोचक टोला

"माझ्या त्यांच्याबद्दलच्या भावना मी वेळोवेळी मांडलेल्या आहेत. पण काही लोकांना 'ध' चा 'मा' करायची सवयच असते, अशा नाटकीबाज लोकांना..."
"कावळ्याच्या शापानी गाय मरत नसते", जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांना खोचक टोला

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर जहरी टीका केली होती. यावर अजित पवारांनी आव्हाडांचे नाव न घेता पलटवार केला. मात्र, आता जितेंद्र आव्हाड यांनी थेट अजित पवारांचे ट्विट शेअर करत त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. "कावळ्याच्या शापानी गाय मरत नसते", असे आव्हाड यांनी म्हटले आहे.

जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट जसेच्या तसे-

"नाटकी लोकांना किमत देत नाही तर खुलासा कश्याला करता आहात.

साहेबांच्या नावाचा फायदा तुम्हाला किती झाला हा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारा तुमच्या मनातले तोंडात आले आणि महाराष्ट्राला सत्य कळले

जाऊ द्या कधी तरी खरा चेहरा बाहेर येतोच

नाहीतर तुम्ही इतकी सारवासारव केली नसती

आणि हो कावळ्याच्या शापानी गाय मरत नसते"

आव्हाडांच्या टीकेवर काय म्हणाले अजित पवार?

"काल माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढला गेला आहे. माझं पहिल्यापासून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र असल्यापासून एवढंच म्हणणं होतं की, ज्येष्ठ नेत्यांनी शारीरिक दगदगीचा विचार करावा आणि प्रकृतीची काळजी घ्यावी. हे मत मी पूर्वी देखील मांडलेलं आहे. मात्र काही लोक स्वतःच्या राजकारणासाठी ज्येष्ठ नेत्यांचा वापर करू पाहतात. त्यांना ह्या गोष्टी कळणार नाहीत", अशी पोस्ट अजित पवार यांनी 'एक्स'वर केली.

तसेच, "माझ्या त्यांच्याबद्दलच्या भावना मी वेळोवेळी मांडलेल्या आहेत. पण काही लोकांना 'ध' चा 'मा' करायची सवयच असते, अशा नाटकीबाज लोकांना मी महत्त्व देत नाही. मात्र सर्वसामान्य लोकांना माझ्या भावना कळाव्यात, म्हणून मी हे म्हणणं मांडत आहे", असेही ते म्हणाले. त्यांच्या या पोस्टमध्ये त्यांनी कुठेही जितेंद्र आव्हाड यांचे नाव घेतले नाही. मात्र, आव्हाड यांनी थेट त्यांची पोस्ट शेअर करत त्यावर निशाणा साधला आहे.

कुठून सुरु झाले प्रकरण?

अजित पवार यांनी बारामतीत, "शेवटची निवडणूक आहे असं भावनिक आवाहन केलं जाईल', कधी शेवटची निवडणूक असेल काय माहीत...?", असे म्हणत भावनिक आवाहनाला बळी न पडण्याचा सल्ला दिला होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी अजित पवारांवर सडकून टीका केली होती.

एखाद्या माणसाच्या मृत्यूची प्रार्थना करणे कितपत योग्य आहे. काकाच्या मृत्यूची वाट बघतोय. शरद पवार अजरामर राहतील, त्यांचे योगदान अजरामर राहतील. शरद पवार कधी मरतील याची तुम्ही वाट बघता. अजित पवार यांनी आज हद्द ओलांडली. भावनिक आवाहन तुम्ही करता येणाऱ्या काळात जनता आणि बारामतीकर तुम्हाला तुमची जागा दाखवतील, असे आव्हाड म्हणाले होते. तसेच, लाज वाटते मला तुमच्या सोबत काम केल्याची. आधी पण वाटतच होती. शरद पवार देशाचे नेते तुम्हाला महाराष्ट्रात कोण ओळखत नाही. ज्या कुटुंबाने तुम्हाला सर्व दिले, ज्या माऊलीने तुम्हाला सर्व दिले तीच कुंकू कधी पुसले जाईल याची आज तुम्ही वाट बघता. असले घाणेरडे राजकारण महाराष्ट्राने कधी बघितले नाही, असेही आव्हाड यांनी म्हटले होते. दरम्यान, आव्हाड यांच्या वक्तव्याव राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी त्यांचा खरपूस समाचार घेतला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in