महाविकास आघाडीत तिढा; ४० जागांवर एकमत, ८ जागांचा घोळ संपेना

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांत हालचालींना वेग आला असून, महाविकास आघाडीत बैठकांचे सत्र सुरू झाले आहे.
महाविकास आघाडीत तिढा; ४० जागांवर एकमत, ८ जागांचा घोळ संपेना

राजा माने/मुंबई

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांत हालचालींना वेग आला असून, महाविकास आघाडीत बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. त्यामुळे जागावाटपावरून आघाडीत कसलेही मतभेद नसल्याचे बोलले जात असले तरी हळूहळू मतभेद समोर येताना दिसत आहेत. महाविकास आघाडीत लोकसभेच्या एकूण ४८ पैकी ४० जागांवर मतैक्य झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र, ८ जागांवरून तिन्ही पक्षांत मतभेद असल्याचे बोलले जात आहे.

विशेषत: शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्येच वाटाघाटी सुरू असल्याचे बोलले जात आहे. त्यातच वंचित आघाडी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना हेही महाविकास आघाडीत येण्याची शक्यता लक्षात घेऊन या दोन्ही पक्षांना शिवसेनेच्या वाट्यातील जागा देण्याचे ठरल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे एक-एक जागेवर वंचित आघाडी आणि स्वाभिमानीचे समाधान होणार का, हाही प्रश्न आहे.

महाविकास आघाडीची मंगळवारी मुंबईत बैठक झाली. या बैठकीत वंचित आघाडी महाविकास आघाडीत सामिल झाल्याचे जाहीर करण्यात आले असून, खा. संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचा विस्तार झाल्याचा दावा केला. विशेष म्हणजे महाविकास आघाडीत जागावाटपावरून कुठलेही मतभेद नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीत ४८ पैकी ४० जागांवर मतैक्य झाले आहे. मात्र, ८ जागांवरून मतभेद आहेत. आता या ८ जागांचा तिढा राज्य पातळीवरच सोडवण्याचे महाविकास आघाडीतील नेत्यांचे प्रयत्न आहेत.

आता यासंदर्भात २ फेब्रुवारी रोजी पुन्हा महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीत काही जागांवरून समोर आलेले मतभेद मार्गी लावण्याचा सर्वच नेत्यांचा प्रयत्न राहणार असल्याचे बोलले जात आहे.

अद्याप आघाडीत नाही : आंबेडकर

वंचित आघाडीचा अद्याप महाविकास आघाडीत समावेश झालेला नाही. मंगळवारच्या बैठकीत काय ठरले, याची माहिती मागितली आहे. अद्याप महाविकास आघाडीत जागा वाटपाचे सूत्र ठरलेले नाही. आम्ही दोन पावले मागे येण्यास तयार आहोत. परंतु, आम्हाला दिलेल्या पत्रात फक्त काँग्रेसच्या नाना पटोले यांचीच स्वाक्षरी आहे. अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांची स्वाक्षरी नाही. त्यामुळे आम्ही अजून महाविकास आघाडीत सामिल झालेलो नाही, असे वंचित आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी स्पष्ट केले.

या जागांवरून मतभेद

महाविकास आघाडीत ४८ पैकी ८ जागांवर तिढा आहे. यामध्ये रामटेक, हिंगोली, वर्धा, भिवंडी, जालना आणि शिर्डी यासोबतच दक्षिण-मध्य मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई यावरही काँग्रेस पक्ष दावा करत आहे. मात्र, मुंबईतील दोन्ही जागांवर शिवसेनेचा विजय झालेला आहे. त्यामुळे शिवसेना मुंबईच्या जागा सोडण्यास तयार नाही. तसेच शिर्डी, रामटेक, जालन्याची जागाही शिवसेना सोडण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे काँग्रेस नेते यात कशी तडजोड घडवून आणू शकतात, यावर पुढील काही दिवसांत चित्र स्पष्ट होऊ शकते.

logo
marathi.freepressjournal.in