निर्दयी सरकारकडे भावनांचा दुष्काळ; उद्धव ठाकरेंची टीका

रविवारी औरंगाबाद जिल्ह्यातील विविध गावांमध्ये जाऊन अतिवृष्टीने झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी केली.
निर्दयी सरकारकडे भावनांचा दुष्काळ; उद्धव ठाकरेंची टीका

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार हे केवळ उत्सवप्रिय असून, शेतकऱ्यांप्रती ते अतिशय निर्दयीपणे वागत आहे. भावना नसलेले हे सरकार असून, त्यांच्याकडे भावनांचा दुष्काळ आहे. हे उत्सवी सरकार, उत्सव साजरे करताना राज्यातील प्रजा दु:खात आहे, हेदेखील पाहत नाही. माझ्याशी आणि शिवसेनेशी गद्दारी केली; मात्र बळीराजाशी गद्दारी करू नका, अशी प्रखर टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी औरंगाबाद जिल्ह्यातील विविध गावांमध्ये जाऊन अतिवृष्टीने झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पेंढापूरमधून शेताच्या बांधावर पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले. सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा तसेच राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. दहेगाव आणि पेंढापूरमधील परिस्थिती पाहिल्यानंतर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे आढळून आले, तरीही कृषिमंत्री ओल्या दुष्काळाच्या निकषांबाबत बोलत आहेत. ओल्या दुष्काळाचा नेमका निकष काय? आणखी चिखलात बुडवून काढायची आहेत का पिके? असा सवाल ठाकरेंनी केला. आमच्या काळात एनडीआरएफचे निकष बदलण्यात आले होते. जनतेची मागणी हेक्टरी ५० हजार रुपये इतकी आहे, आमचा त्याला पाठिंबा असल्याचे ठाकरे म्हणाले.

महाविकास आघाडीच्या काळात दोन ते अडीच वर्षे कोरोनात गेली. लॉकडाऊनच्या काळात शेतकरी राबला नसता, तर दिवाळे निघाले असते. हल्ली पावसाची सुरुवात चक्रीवादळाने होते. नंतर पूर, ढगफुटी असे प्रकार होतात. गेल्या आठवड्यात पुणे तुंबले होते. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी पाऊस किती पडावा, हे महापालिकेच्या हातात नसते, असे विधान केले होते. ग्रामीण भागातील पावसाबद्दल आणि चिखलाबद्दल ते म्हणतील, पाऊस किती पडावा हे सरकारच्या हातात नसते, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

“हे सरकार बेदरकारपणे सांगतेय की, ओला दुष्काळ जाहीर करण्याची स्थिती नाही. शेतकरी संकटात असताना मी इथे आलो, कारण शेतकऱ्यांच्या नुकसानीची स्थिती राज्यातील आणि देशातील जनतेला कळायला हवी. संकटे येत असतात, त्या काळात सरकारला तुमच्याकडे लक्ष द्यायला वेळ नसला, तरी शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारचे घटक पक्ष तुमच्या पाठिशी आहोत. शेतकरी म्हणून एक व्हा, शेतकऱ्यांनी आसूड वापरायला हवा, आसूड तुमच्या हातामध्येच शोभून दिसतो. शेतकऱ्यांनी आसूडाच्या माध्यमातून सरकारला घाम फोडला पाहिजे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत. सरकारला पाझर फुटत नसेल, तर आम्ही त्यांना घाम फोडू,” असा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिला.

ठाकरे म्हणाले, “घोषणांची अतिवृष्टी करणाऱ्या सरकारकडे भावनांचा दुष्काळ आहे. हे सरकार उत्सवात मग्न आहे. तसेच हा दौरा केवळ प्रातिनिधिक असून, मी पुन्हा येणार आहे.”

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in