धोम धरणाच्या पाण्यात बुडून पिता-पुत्राचा मृत्यू

धोम धरणातून भोर,खंडाळा व फलटण तालुक्याला बलकवडी धरणाच्या आसरे गावाजवळच्या बोगद्यातून कालव्याद्वारे पाणी सोडण्यात येते. सध्या कालवा बंद आहे; त्यामुळे येथे गेट बंद आहे. त्यामुळे येथे पाणी साठलेले असते.
धोम धरणाच्या पाण्यात बुडून पिता-पुत्राचा मृत्यू

कराड : साताऱ्यातील वाई तालुक्यातील धोम धरणाच्या आसरे बोगदा कालव्याच्या पाण्यात बुडून पिता-पुत्राचा मृत्यू झाला. आंबेदरा आसरे (ता. वाई) येथे ही दुर्दैवी घटना घडली. अभिजीत उत्तम ढवळे व उत्तम सहदेव ढवळे अशी या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या पिता-पुत्राची नावे आहेत.

धोम धरणातून भोर,खंडाळा व फलटण तालुक्याला बलकवडी धरणाच्या आसरे गावाजवळच्या बोगद्यातून कालव्याद्वारे पाणी सोडण्यात येते. सध्या कालवा बंद आहे; त्यामुळे येथे गेट बंद आहे. त्यामुळे येथे पाणी साठलेले असते. या कालव्याच्या पाण्यात सोमवारी (१ मार्च) रोजी सायंकाळी ५ वाच्या सुमारास उत्तम ढवळे व अभिजीत ढवळे हे दोघे पिता-पुत्र पोहण्यासाठी गेले होते. यावेळी कालव्याच्या पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे दोघेही पाण्यात बुडाले. लोकांनी आरडाओरडा केल्यानंतर परिसरातील लोक धावून आले व त्यांनी त्यांचा शोध सुरू केला; मात्र ते सायंकाळी उशीरापर्यंत मिळून आले नाहीत.

यानंतर मंगळवारी सकाळी महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम व वाई आपदा ट्रेकर्स टीमच्या सुनील भाटिया यांना कळविण्यात आले. महाबळेश्वर ट्रॅकर्सचे सुनील बाबा भाटीया अमीत कोळी सचिन डोईफोडे, सौरव साळेकर सौरभ गोळे अनीमेष बिरामणे आणि प्रतापगड सर्च अँड रेस्क्यु टिमचे अजीत जाधव आशीष बिरामणे ऋषीकेष जाधव आशीतोष शिंदे या दोन्ही टिमच्या कार्यकत्यांनी बोटीच्या साह्याने दिवसभर शोध मोहीम राबवून मंगळवारी सायंकाळी या पिता-पुत्राचे मृतदेह अखेर बाहेर काढले.

logo
marathi.freepressjournal.in