आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा! उद्धव, आदित्य, अनिल परब यांच्यावर आरोप करण्यासाठी फडणवीसांचा दबाव

आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा! उद्धव, आदित्य, अनिल परब यांच्यावर आरोप करण्यासाठी फडणवीसांचा दबाव

श्याम मानव, अनिल देशमुख यांचा गौप्यस्फोट, माझ्या नादी लागणाऱ्याला मी सोडत नाही - फडणवीस
Published on

मुंबई : अनिल देशमुख यांना प्रतिज्ञापत्राद्वारे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अजित पवार यांच्यावर आरोप करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दबाव टाकला होता, असा आरोप श्याम मानव यांनी केला आहे. त्यावरून आता आरोप - प्रत्यारोपांचा धुरळा उडाला आहे. माजी मंत्री अनिल देशमुख यांनीही श्याम मानव यांच्या सुरात सूर मिसळत फडणवीसांवर आरोप केल्याने संतप्त झालेल्या फडणवीस यांनी, ‘माझ्या नादी लागणाऱ्यांना मी सोडत नाही’, असा दम भरला आहे.

एकमेकांची कुलंगडी बाहेर काढून आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडवून द्यायचा ही राजकारण्यांची खोड अलिकडच्या काळात फारच फोफावली आहे. विशेष म्हणजे माझ्याकडे आरोपांचे पुरावे आहेत, असे म्हणत हवेत बार सोडायचे अन‌् हे (नसलेले) पुरावे कधीच जाहीर करायचे नाहीत, ही कुप्रथाही अलीकडे चांगलीच रुढ झाली आहे. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून ‘खोटे बोल, पण रेटून बोल’ हाही नवा पायंडा राजकारणात अलीकडे पडला आहे. आता श्याम मानव, माजी मंत्री अनिल देशमुख व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांचे बाण सोडून आपल्याकडे याबाबत पुरावे असल्याचे छातीठोकपणे सांगत एकमेकांना आव्हान दिले आहे. हा वाद आता चांगलाच रंगात आला आहे.

श्याम मानव व अनिल देशमुख यांच्या आरोपांना उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, राज्यात माझ्यावर टीका करण्यासाठी काही सुपारीबाज तयार झाले असून ते सुपारी घेऊन आरोप करतात. श्याम मानव हे त्यांच्या नादी लागलेत का हे पाहावे लागेल.

उद्धव ठाकरे आणि अजित पवारांना अडकवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी दबाव आणला होता, असा आरोप अनिल देशमुखांनी केला आहे. त्यावर फडणवीस म्हणाले की, अनिल देशमुख यांच्यावर आरोप झाल्यानंतर राज्यात महाविकास आघाडी सरकार होते. त्या प्रकरणी मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. अनिल देशमुख त्यानंतर जेलमध्ये गेले. आता ते बेलवर बाहेर आहेत.

अनिल देशमुखांनी याआधीही आपल्यावर आरोप केले होते. मी आधी यावर बोललो नव्हतो. मी कुणाच्या नादी लागत नाही आणि कुणी नादी लागले तर सोडत नाही. मला देशमुखांना एकच सांगायचे आहे, त्यांच्याच पक्षाच्या काही नेत्यांनी माझ्याकडे काही ऑडिओ रेकॉर्डिंग दिले आहेत. त्यामध्ये अनिल देशमुख शरद पवार, उद्धव ठाकरे, सचिन वाझे यांच्याबद्दल काय म्हणत आहेत हे दिसतेय. रोज कुणी माझ्यावर आरोप करत असेल तर मी शांत न बसता योग्य वेळी सर्व गोष्टी उघड करीन. मी हे पुराव्याशिवाय बोलत नाही, असा इशारा त्यांनी देशमुख यांना दिला.

श्याम मानव काय म्हणाले?

अजित पवारांनी गुटखा व्यावसायिकांकडून कोट्यवधीची कमाई करून मागितली, उद्धव ठाकरेंनी १०० कोटी रुपयांची वसुली मागितली, आदित्य ठाकरेंनी दिशा सॅलियनवर बलात्कार करून हत्या केली, अनिल परबांनी गैरव्यवहार केले, याचे चार ॲफिडेव्हिड द्या आणि ईडी प्रकरणातून सुटका करून घ्या, अशी ऑफर फडणवीसांनी अनिल देशमुखांना दिली होती, असा दावा श्याम मानव यांनी केला होता. मात्र, अनिल देशमुखांनी ही ऑफर नाकारली आणि १३ महिने तुरुंगवास भोगला, असा दावाही श्याम मानव यांनी केला.

जरांगेंच्या अटक वॉरंटमध्ये संबंध नाही

मनोज जरांगे यांच्याविरोधात निघालेल्या अटक वॉरंटमध्ये राज्य सरकारचा काही संबंध नाही. मनोज जरांगेंची केस आहे ती २०१३ सालची आहे. यापूर्वीदेखील त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले होते. पण ते हजर राहिल्यानंतर ते रद्द झाले. आता पुन्हा ते तारखेला गेले नाहीत, त्यामुळे त्यांच्याविरोधात वॉरंट निघाले. ते तारखेवर हजर राहिले तर वॉरंट रद्द होतात. मनोज जरांगे गेल्या वेळी माझ्या आईवर बोलले होते. नंतर त्यांनी माफी मागितली. उपोषणामुळे त्यांना त्रास झाला होता, त्यामुळे तसे वक्तव्य झाले, असे ते म्हणाले होते. आताही उपोषणामुळे पुन्हा त्यांचा संताप झाला असेल. त्यामुळे त्यांनी अशी वक्तव्य केली असतील, असा टोला फडणवीस यांनी लगावला.

logo
marathi.freepressjournal.in