सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील जंगलात एक परदेशी महिला साखळीने झाडाला बांधलेल्या अवस्थेत आढळून आली. तिच्याकडे अमेरिकेचा मुदत संपलेला पासपोर्ट असून तिच्या आधार कार्डवर तामिळनाडूचा पत्ता आहे. एका गुराख्याने पोलिसांना माहिती दिल्यानंतर या महिलेची सुटका करण्यात आली. सध्या तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजते. महिलेला मानसिक आजार आहे.
सिंधुदुर्गातील सोनुर्ली गावाजवळील जंगलात शनिवारी सायंकाळी महिलेचा रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. हा आवाज एका गुराख्याने ऐकला. पुढे जात त्याने पाहिले असता झाडाला साखळदंडाने बांधलेल्या अवस्थेत त्याला ही महिला दिसली. तत्काळ त्याने पोलिसांना ही माहिती दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठत साखळीतून तिची सुटका करून उपचारासाठी सावंतवाडी येथील रुग्णालयात नेले. तेथून तिला ओरोस येथील अत्याधुनिक रुग्णालयात पाठविण्यात आले.
महाराष्ट्र पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणात उशीरापर्यंत एफआयआर नोंदवण्यात आला नव्हता. परंतु तपास सुरू करण्यात आला आहे. महिला तिचे म्हणणे मांडण्याच्या स्थितीत नाही. गेल्या काही दिवसांपासून तिने काहीच खाल्ले नसल्याने ती अशक्त झाली आहे. तिला किती वेळ बांधून ठेवले होते ते आम्हाला माहीत नाही.