छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अखेर जामीन, कोल्हापूर न्यायालयाचा निर्णय

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला अखेर जामीन, कोल्हापूर न्यायालयाचा निर्णय
Published on

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. कोरटकर याने काही दिवसांपूर्वी कोल्हापूर येथील इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना दूरध्वनी करुन धमकी दिली होती. यावेळी त्याने छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधान केल्याचे समोर आले होते.

यापूर्वी न्यायालयाने प्रशांत कोरटकर याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. यानंतर १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान, कोरटकरने जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यामुळे कोरटकरचा कळंबा कारागृहातील मुक्काम वाढला होता.

न्यायालयात तांत्रिक गोष्टींचा आधार घेतला असल्याचे वकील असीम सरोदे यांनी सांगितले. ज्या कलमांच्या आधारे गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये तीन वर्षापेक्षा जास्त शिक्षा नसल्याचे सरोदे यांनी सांगितले. प्रशांत कोरटकरवर अब्रुनुकसानीचा दावा करण्यात आला आहे. इंद्रजित सावंत यांनी कारागृहाच्या पत्त्यावरच कोरटकरला सरोदे यांच्याकडून कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

न्यायालयात प्रशांत कोरटकरने दाखल केलेल्या जामीन अर्जात त्याने इतिहास संशोधक इंद्रजित यांनी अनेकदा स्वतःच छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान केला आणि सावंत यांच्यावरच सामाजिक तेढ निर्माण करण्याबाबतचे गुन्हे नोंद आहेत व त्यांना अटक झाली होती, इत्यादी खोटी माहिती लिहिली होती. त्यातून इंद्रजीत सावंत यांची बदनामी करण्यात येत असल्याचा आक्षेप घेण्यात आल्यानंतर प्रशांत कोरटकरतर्फे ते परिच्छेद रद्द करीत असल्याचे न्यायालयासमोर लेखी स्वरूपात सांगण्यात आले होते.

logo
marathi.freepressjournal.in