अंतरीचे झरे जपणारा नेता

अंतरीचे झरे जपणारा नेता

नितीन गडकरी हे एक विलक्षण व्यक्तिमत्त्व असल्याचं मला वारंवार जाणवतं. म्हणूनच सर्वप्रथम वाढदिवसानिमित्त या विलक्षण व्यक्तिमत्त्वाला शुभेच्छा देतो. कुशल राजकारणी म्हणून ते देशाला ठाऊक आहेतच, पण त्यांची मनस्वी व्यक्ती ही ओळख मला अधिक भावते, कारण प्रत्येक भेटीमध्ये त्यांच्यातला हा प्रभावी पैलू बघून मी भारावून जातो.

लोकांना आपला प्रतिनिधी जवळचा वाटणं, हवा तेव्हा संपर्क साधता येण्याजोगा वाटणं आणि ती आपल्यातलीच एक व्यक्ती असल्याची खात्री वाटणं अत्यंत आवश्यक असतं. माझ्या मते, या सगळ्या जनभावना ओळखून त्याची पूर्तता करणारा नेता म्हणजे गडकरीसाहेब! याचं कारण म्हणजे आपण सर्वसामान्य लोक जगण्याची जी भाषा बोलतो, जी मूल्यं जपतो, नेमकी तीच मूल्यं आणि भाषा त्यांच्या जगण्यातही दिसते. त्यांच्या आवडीनिवडी, ऐकणं, बोलणं हे सगळं साधं आणि कोणत्याही सर्वसामान्य माणसासारखं आहे. केवळ साहेबच नाही तर त्यांचं सगळं कुटुंब याच तत्त्वाच्या आधारे जगणारं आहे. त्यांच्या घरातल्या सर्व सदस्यांशी माझा चांगला परिचय आहे. गडकरीवहिनी तर त्या घराचा कणा आहेत. माणसं जोडणारी ती दक्ष गृहिणी आहे. त्यांच्या दोन्ही मुलांनी आणि मुलगी केतकी हिनेदेखील माणसं जोडून ठेवली आहेत. केतकीचं लग्न नागपुरमधल्या उच्चशिक्षित अशा सॉफ्टवेअर इंजिनिअर असणाऱ्या मुलाशी झालं. म्हणजेच एकीकडे राजकीय आयुष्य सांभाळत असताना माणूस म्हणून एक वेगळा मार्ग त्यांनी तसंच कुटुंबीयांनी कायमच जपला आहे. घरचे लोक तुमच्याशी आणि तुम्ही घरच्यांशी कसे वागता, याची मोठी छाप एखाद्याच्या सार्वजनिक छबीवर पडत असते. मी अशीही माणसं बघितली आहेत, ज्यांना कुटुंबासवे बघताना त्यांच्यामध्ये एकमेकांप्रती नाराजी असल्याचं स्पष्ट जाणवतं. त्यांच्या देहबोलीतून, वागण्या-बोलण्यातून ते प्रतित होत असतं. माझ्या मते, सहचारिणी अथवा घरातले सदस्य आदींचा अशा मोठ्या व्यक्तिमत्त्वाच्या सार्वजनिक प्रतिमेवर खूप प्रभाव पडत असतो. या दृष्टीने संपूर्ण गडकरी परिवार आजही अगदी सामान्य आयुष्य जगू शकतो, सामान्यांना आपल्यातलाच एक भासू शकतो. ही त्यांची सर्वात मोठी मिळकत आहे, यात शंका नाही.

घरातला गणपती बसवणं असो वा एखादा समारंभ साजरा करणं असो... या कुटुंबातला एकोपा, एकमेकांप्रतीची आस्था कायमच स्पष्ट दिसते. मी बरेचदा त्यांच्या घरी गेलो आहे. त्या प्रत्येक वेळी आपण आपल्या काकाच्या, मामाच्या अथवा मोठ्या भावाच्या घरी आल्यासारखं जाणवतं, कारण ते घर तुम्हाला तो फील देतं. त्या घरात हवीहवीशी आणि आल्हाददायक ऊब जाणवते. तिथे एक वेगळाच आपलेपणा जाणवतो. एखाद्या मोठ्या राजकारण्याच्या घरातलं वातावरण इतकं सहज आणि साधं असावं ही बाब दुर्मीळ म्हणावी लागेल.

गडकरीसाहेब संगीताचे चाहते आहेत. ते हिंदी गाणी खूप ऐकतात. ते मराठी चित्रपटांचेही चाहते आहेत. ‘मी वसंतराव’ हा चित्रपट त्यांनी आवर्जून बघितला आणि त्याचं तोंड भरुन कौतुक केलं. शास्त्रीय संगीत हीदेखील त्यांच्या आवडीची बाब आहे. एकूणच कलाविश्‍वात कोणाचं काय सुरू आहे याकडे त्यांचं लक्ष असतं. मला आठवतंय, त्यांच्या लग्नाच्या २५ व्या वाढदिवसानिमित्त आम्ही सादर केलेल्या कार्यक्रमात त्यांनी स्टेजवर येऊन ‘नसतेच घरी तू जेव्हा...’ हे गीत गायलं होतं. हॉटेलच्या छोट्या हॉलमध्ये मोजक्या लोकांच्या उपस्थितीत त्यांनी आमचा कार्यक्रम आयोजित केला होता. इतक्या व्यापामध्ये असतानाही त्यांनी स्वत:मधला साहित्य-कला-संगीतप्रेमी जिवंत ठेवला आहे हे विशेष... दुसऱ्या भाषेत बोलायचं तर त्यांनी आतले झरे जिवंत ठेवले आहेत. वर प्रसिद्धीचे, अधिकाराचे, अपेक्षांचे थर चढत असतानाही मनातला झरा बुजणार नसल्याची काळजी घेतली आहे. अशी ही कटाकाळजीनं जपलेली निखळता, मनस्विता त्यांच्या हास्यातूनही सहज जाणवते. त्यांचा तो मिश्किलपणा खूप काही सांगून जातो. कोणताही नाटकीपणा अथवा दिखावा न करता सामोरं येणारं हे निरलस व्यक्तिमत्त्व आहे असंच मी म्हणेन.

साहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी मी थेट फोन करण्यापेक्षा आधी वहिनींना फोन करतो. पण त्या हटकून म्हणतात, तुम्ही त्यांच्याशीच बोला की, थांबा देते फोन त्यांच्याकडे... इथेच आहेत...! हा साधेपणा, निगर्वीपणा या कुटुंबाला इतरांपासून वेगळी ओळख देतो. अन्यथा, कोणाकडे फोन केल्यानंतर अत्यंत रुक्ष स्वरात, बघा ना त्यांनाच फोन करुन... असं वाक्य कानी येतं तेव्हा त्यांच्या नात्यामधली रुक्षता लगेचच कळते. मात्र गडकरी कुटुंबात हे वातावरण कधीच दिसत नाही. त्यांची मुलंही सगळ्यांच्या संपर्कात असतात. त्यांच्याशीही कधीही संपर्क साधता येऊ शकतो. एखाद्याला आमंत्रण द्यायचं असेल तर तो उपलब्ध असणं, तो आपल्या आमंत्रणाचा स्वीकार करेल याची खात्री वाटणं ही खूप मोठी बाब आहे, असं मला वाटतं.

केंद्रीय मंत्री होण्यापूर्वी आणि केंद्रीय मंत्री झाल्यानंतरही मी या कुटुंबाला पाहिलं आहे. आमच्यामध्ये खूप वर्षांपासून चांगलं नातं आहे. त्यांनी कायम माझ्या कामाची स्तुती केली. ‘आयुष्यावर बोलू काही’, ‘मैत्र जीवांचे’ ऐकून पाठीवर कौतुकाची थापही दिली आहे. नागपूरमध्ये आमचा कार्यक्रम असला तरी अर्ध्यापेक्षा अधिक वेळा त्यांच्या कुटुंबातला कोणी ना कोणी सदस्य उपस्थित असतोच. त्यांनी आमचे बरेच कार्यक्रम आयोजितही केले आहेत. त्या प्रत्येक वेळी कलावंत म्हणून ते आम्हाला देत असणारा मान-आदर जाणवल्याशिवाय राहत नाही. एखादा कार्यक्रम आयोजित केला असेल तर स्वत: उपस्थित राहण्याचा नियम ते कटाक्षाने पाळतात. मुख्य म्हणजे उपस्थित असतील तो सगळा वेळ ते कार्यक्रमाचा आनंद घेतात. एकीकडे स्टेजवर कार्यक्रम सुरू आहे आणि साहेब एखाद्या व्यक्तीशी बोलत आहेत वा फोन बघत आहेत असं कधीच होत नाही. कलाकाराच्या सादरीकरणाकडे त्यांचं पूर्ण लक्ष असतं. ही बाबही मला अत्यंत महत्त्वाची वाटते. थोडक्यात सांगायचं तर, ते एखाद्याला दाखवण्यासाठी गाणं ऐकत नाहीत तर आनंद घेण्यासाठी ऐकतात. प्रत्येक कलेचा आस्वाद घेतात. कार्यक्रमाच्या आधी अथवा नंतर गाठ घेऊन ते कलाकारांची भेट घेतात आणि आस्थेनं विचारपूस करतात. इतका मोठा माणूस ‘तुम्ही कसे आहात?’, ‘कार्यक्रम कसे सुरू आहेत ?’ असं आपुलकीने विचारतो तोच खरं तर त्या कलाकाराचा मोठा सन्मान असतो. असा सन्मान आणि असा आनंद ते अनेकांना देतात .

एकदा मुंबईमध्ये त्यांच्यावर छोटी शस्त्रक्रिया पार पडली होती. रुग्णालयात असतानाच त्यांनी शिवाजी मंदिराला ‘आयुष्यावर बोलू काही’ कार्यक्रम असल्याची जाहिरात वाचली होती. ती लक्षात ठेवून रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरी न जाता ते थेट या कार्यक्रमाला आले होते. त्यांनी तो कार्यक्रम शांतपणे ऐकला आणि नंतर भेटून म्हणाले, ‘मला या निवांतपणाची, बदलाची अत्यंत आवश्यकता होती, म्हणून थेट इकडे आलो...’ माझ्यासाठी त्यांनी दिलेली ही दाद संस्मरणीय आहे, कारण इतक्या मोठ्या राजकीय व्यक्तीने वृत्तपत्रात जाहिरात वाचून कार्यक्रमाला येणं हे खूप वेगळं उदाहरण म्हणावं लागेल. त्यावेळी त्यांच्याबरोबर फक्त दोन लोक होते. बाकी कोणताही ताफा बरोबर नव्हता. त्यांचा हा साधेपणा आणि कलासक्ती कायम लक्षात राहणारी आहे. आपल्या कलेमुळे त्यांच्यासारख्या मोठ्या व्यक्तीला शांततेचे दोन क्षण मिळाले याचा कलाकार म्हणून मला अत्यंत आनंद राहील.

गडकरीसाहेब स्वत: आणि त्यांचं सगळं कुटुंब अत्यंत अतिथ्यशील आहे. मी अनेकदा त्यांच्याकडे जेवलो आहे. ते सगळे पदार्थ चाखून बघण्याचा आग्रह करतात. जातीनं आग्रह करुन पदार्थ खायला लावतात. आमच्याकडचा हा खास पदार्थ आहे... असं सांगत त्याचा आस्वाद घेण्यास भाग पाडतात. थोडक्यात, आयुष्याचा सर्वांगानं रसास्वाद घेणं या कुटुंबाची मूळ प्रवृत्ती आहे. तिकडे गेल्यानंतर आजूबाजूच्या परिसरात काय बघण्यासारखं आहे, हेदेखील ते आवर्जून सांगतात. इथलं अभयारण्य जरुर बघा... असं म्हणून त्याच्या वैशिष्ट्याबद्दल चर्चा करतात. म्हणजेच एवढ्या मोठ्या खात्याचं मंत्रिपद सांभाळताना, दिल्लीत निवास करतानाही त्यांनी मातीशी आपली नाळ घट्ट जोडून ठेवली आहे. मराठी भाषेशी, संगीताशी, नाटकाशी, चित्रपटांशी असणारं त्यांचं नातं अतिशय घट्ट आहे. साहेब अष्टावधानी आहेत आणि अशी अष्टावधानी माणसं दहा लोकांना भेटली तरी त्या प्रत्येकात जे चांगलं आहे, तो गुण लक्षात ठेवतात. त्यांच्या इतक्या गोष्टी, इतकी कामं सुरू असतात तरीदेखील भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीची ओळख, त्याच्याशी झालेली चर्चा त्यांच्या नेमकी लक्षात असते. पुन्हा भेटल्यानंतर आधीच्या भेटीत कोणती चर्चा झाली होती, हे ते नेमकेपणानं सांगू शकतात. अशी क्षमता फार कमी लोकांमध्ये पहायला मिळते. नितीन गडकरी साहेबांमध्ये ती आहे म्हणूनच ते सगळ्यांमध्ये उठून दिसणारे नेते आहेत, असं म्हणता येईल.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in