बिबट्याचा बछडा विसावला आईच्या कुशीत; पाटणजवळील नारळवाडी येथे रेस्क्यू ऑपरेशन

नारळवाडी (ता. पाटण) येथे रविवारी दुपारी ऊसतोड करणाऱ्या कामगारांना उसाच्या पाचटीत बिबट्याचे पिल्लू आढळून आले होते.
बिबट्याचा बछडा विसावला आईच्या कुशीत; पाटणजवळील नारळवाडी येथे रेस्क्यू ऑपरेशन
Published on

कराड : नारळवाडी (ता. पाटण) येथे रविवारी दुपारी ऊसतोड करणाऱ्या कामगारांना उसाच्या पाचटीत बिबट्याचे पिल्लू आढळून आले होते. त्यानंतर सदर ऊस शेतमालक शेतकऱ्याने याबाबतची माहिती वन विभागाला कळवल्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रेस्क्यू करत बिबट्याच्या बछड्याला ताब्यात घेतले. तसेच रात्रीच्या वेळी कॅरेटमध्ये बिबट्याचा बछडा ठेवून ते सीसीटीव्हीच्या कक्षेत त्याच ठिकाणी ठेवण्यात आले. यादरम्यान मादी बिबट्याने येऊन तिच्या बछड्याला सुरक्षितपणे घेऊन गेली. त्यामुळे अखेर बछडा आपल्या आईच्या मायेच्या कुशीत सुखरूप विसावला.

नारळवाडी येथील बाग नावाच्या शेत शिवारात रविवारच्या सुमारास ऊसतोड करणाऱ्या कामगारांना ऊसाच्या पालापाचोळात बिबट्याचा बछडा आढळून आला. यावेळी मादी बिबट्या जवळपास असल्याच्या भीतीने ऊसतोड कामगारांनी तेथून पळ काढला. त्यानंतर याबाबतची खबर वन विभागाला कळवण्यात आली. वन विभागाने तत्काळ परिसरात येऊन बछडा ताब्यात घेतला. तेथील परिस्थितीची माहिती घेऊन बिबट्या मादी त्याच परिसरात असल्याबत खात्री झाल्याने, तसेच बछडा मागे राहिल्यामुळे मादी बिबट्या चवताळू नये, यासाठी पिल्लू व तिच्या आईचे पुनर्मिलन करण्याचा निर्णय वन विभागाने घेतला.त्यानंतर कराड येथील वाईल्ड लाईफ रेस्कुअर्स टीमला पाचारण करण्यात आले.

दरम्यान, रविवारी संध्याकाळी पुन्हा बछडा ज्या ठिकाणी सापडला, त्याचठिकाणी पुनर्मिलनासाठी विशिष्ठ प्रकारे कॅरेटमध्ये बछडा ठेवून आजूबाजूला कॅमेरे लावण्यात आले. रात्रीच्या शोधात आलेली मादी बिबट्या तिच्या बछड्याला तोंडात धरून घेऊन निघून गेली. बिबट्याचा बछडा सुस्थितीत होता. ते साधारण २ महिन्यांचे मादी बछडा होते.

यावेळी पाटणचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजेश नलवडे , वनपाल ठोंबरे ,वनरक्षक यादव, विशाल हरपळ, रोहीत लोहार, वाईल्ड लाईफ रेस्कुअर्सचे रोहित कुलकर्णी, अजय महाडिक, रोहित पवार, गणेश काळे, रोहन वेळापूरे यांनी यासाठी मोठी मदत केली.

logo
marathi.freepressjournal.in