मंत्री संजय शिरसाट यांना नोटीस बजावावी; मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

औरंगाबाद पश्चिम विधानसभेचे निवडून आलेले शिवसेनेचे उमेदवार तथा मंत्री संजय शिरसाट यांनी भ्रष्ट मार्गाचा अवलंब करून निवडणूक जिंकली.
संजय शिरसाट
संजय शिरसाट संग्रहित छायाचित्र
Published on

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद पश्चिम विधानसभेचे निवडून आलेले शिवसेनेचे उमेदवार तथा मंत्री संजय शिरसाट यांनी भ्रष्ट मार्गाचा अवलंब करून निवडणूक जिंकली. त्यामुळे त्यांची निवड रद्द करण्याच्या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. यावर न्यायमूर्ती किशोर सी. संत यांनी प्रतिवादी राज्य शासन, निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी, मंत्री संजय शिरसाटांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत.

याप्रकरणी पश्चिम मतदारसंघातून पराभूत झालेले राजू शिंदे यांनी ॲड. सिद्धेश्वर ठोंबरे यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. सातारा-देवळाई भागात आप्पासाहेब हिवाळे हे मतदारांना प्रत्येकी पाचशे रुपयांचे वाटप करीत होते.

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाला मतदान करण्याचे आवाहन निवडणुकीदरम्यान करत असल्याचा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर निवडणूक आयोगाच्या पथकाने दखल घेऊन सातारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार संजय शिरसाट यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. दुसऱ्या प्रकरणात शिवसेनेला फायदा व्हावा म्हणून मुस्लिम मतदारांना मतदान न करण्यासाठी काही लोक पैसे वाटत असल्याने जवाहरनगर ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

निवडणुकीच्या दिवशी वाळूज भागात विरोधी उमेदवार राजू शिंदे यांना मतदान होत असल्याने शिरसाटांनी पोलिसांना सांगून लाठीचार्ज करण्यास सांगितले. याबाबतची तक्रार शिंदे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. संजय शिरसाटांनी भ्रष्ट मार्गाने निवडणूक जिंकल्याप्रकरणी याचिकेची पुढील सुनावणी २१ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in