पोलीस अधिकाऱ्यावर पुण्यात कोयत्याने हल्ला

शहरातील रामटेकडी परिसरात भांडण सोडवण्याचा प्रयत्न करणारे एक सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड यांच्यावर एका टोळक्याने कोयत्याने हल्ला केला.
पोलीस अधिकाऱ्यावर पुण्यात कोयत्याने हल्ला
X
Published on

पुणे : पुण्यात अनेक वर्षांपासून कोयता गँगने आपली दहशत माजवली आहे. या कोयता गँगच्या विरोधात आवाज उठवूनही त्यांच्याविरोधात कारवाई होताना दिसत नाही. आता या कोयता गँगची मजल थेट पोलिसांवर हल्ला करण्यापर्यंत पोहचल्याचे रविवारी दिसून आले. शहरातील रामटेकडी परिसरात भांडण सोडवण्याचा प्रयत्न करणारे एक सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड यांच्यावर एका टोळक्याने कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात गायकवाड जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला मार लागला आहे.

रामटेकडी परिसरात दोन टोळक्यांत भांडण सुरू होते. त्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. गायकवाड आरोपींना पकडण्याचा प्रयत्न करत असतानाच त्यांच्यावर रेकॉर्डवरील गुन्हेगार निहाल सिंगने कोयत्याने हल्ला केला. यापूर्वीही त्याने पोलिसांवर हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत.

दरम्यान, गेल्या आठवड्यात एरंडवणे भागात पोलिसांत दिलेली तक्रार मागे घे, असे म्हणत तिघांनी एका तरुणावर कोयत्याने वार केले होते. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात तीन आरोपींविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in