
जळगाव: राज्याच्या आपत्ती विभागाने स्वतःची सॅटेलाइट यंत्रणा विकसित करण्याचा प्रस्ताव शासनाकडे ठेवण्यात येणार असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले गिरणा प्रकल्प कालवा सल्लागार समितीची बैठक तापी विकास महामंडळात पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
कोणत्याही नैसर्गिक आपत्तीचे पूर्व सूचना देणारी सुसज्ज यंत्रणा असावी यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे स्वतःची सॅटेलाइट यंत्रणा विकसित करण्याचा विचार सुरू आहे. याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले.
गिरणा धरणाच्या वरच्या बाजूने सध्या पाण्याचा विसर्ग सुरू असला तरी तोपर्यंत लाभक्षेत्रातील नागरिकांसाठी गिरणा धरणाचे पाणी फक्त पिण्याच्या पाण्यासाठी वापरण्यात यावे. सध्या या धरणात केवळ ३६ टक्के साठा हा आहे. १५ ऑक्टोबर नंतर परिस्थिती पाहून पाण्याच्या आवर्तनाबाबत विचार करण्यात येईल, असे पाटील यांनी सांगितले.
यावेळी मदत आणि पुनर्वसन मंत्र्यांनी विविध कामांचा कामांच्या आपत्ती स्वामीकरण प्रस्तावांचा आढावा घेतला ते म्हणाले आपत्ती व्यवस्थापनाच्या कामांचा प्रस्ताव तयार करताना कामांची प्राथमिकता ठरवून नंतर प्रस्ताव तयार करावा.
राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून भविष्यात प्रत्येक ग्रामपंचायतींना अत्याधुनिक किट देऊन गावातील तरुणांना आपदा प्रशिक्षण देण्याचा विचार आहे. दहा ते पंधरा ग्रामपंचायत मिळवून एका मोठ्या ग्रामपंचायतीसाठी स्वतःची अग्निशमन यंत्रणा विकसित करण्याचाही विचार आहे.
या बैठकीत आमदार चिमणराव पाटील जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता व प्रशासक श्रीकांत दळवी, जळगाव पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता वाय. के. भदाणे, गिरणा बंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता डी.पी. अग्रवाल, आदिती कुलकर्णी, ईश्वर पठार आदी उपस्थित होते.