आयसीयूत उंदीर चावल्याने रुग्णाचा मृत्यू; पुण्यातील ससून रुग्णालयातील घटना

सागर रेणुसे याचा भोर तालुक्यात अपघात झाला होता. त्यानंतर १६ मार्चला त्याला ससून रुग्णालयात दाखल केले. अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू होते. २६ मार्चला त्याची प्रकृती खालावत होती. अधिक चौकशी केली असता त्याला उंदीर चावल्याचे समोर आले.
आयसीयूत उंदीर चावल्याने रुग्णाचा मृत्यू; पुण्यातील ससून रुग्णालयातील घटना

पुणे : पुण्याच्या ससून रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱ्या सागर रेणुसे या तरुणाचा उंदीर चावल्यामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. यातून रुग्णालयातील बेपर्वाई, निष्काळजीपणाचे दर्शन घडले आहे. या घटनेमुळे नातेवाईक संतापले आहेत.

सागर रेणुसे याचा भोर तालुक्यात अपघात झाला होता. त्यानंतर १६ मार्चला त्याला ससून रुग्णालयात दाखल केले. अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू होते. २६ मार्चला त्याची प्रकृती खालावत होती. अधिक चौकशी केली असता त्याला उंदीर चावल्याचे समोर आले. आयसीयूमध्ये त्याच्या डोक्याला, कानाला आणि इतर अवयवांना उंदराने चावा घेतल्याचे उघड झाले. त्यानंतर या तरुणाची प्रकृती खालावत जाऊन मंगळवारी सकाळी त्याचे निधन झाले.

त्याचे निधन झाल्यावर नातेवाईकांनी उंदीर चावल्याचा आरोप केला होता. त्यानंतर काही वेळ डॉक्टरांनी ‘मौन’ पत्करले. मात्र नातेवाईकांचा आक्रोश पाहता डॉक्टरांनी सागर रेणुसेला उंदीर चावल्याचे मान्य केले.

सागरचा फक्त अपघात झाला होता. योग्य उपचार होऊन सागर बरा होईल, अशी नातेवाईकांना अपेक्षा होती. काही प्रमाणात गंभीर मार लागल्याने त्याला ससूनमधील आयसीयूत दाखल केले होते. मात्र ससूनमधील अस्वच्छता आणि भोंगळ कारभारामुळे सागरचा जीव गेला. सागर अचानक गेल्याने त्याच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in