
मुरूड-जंजिरा : मुरूड व काशीद समुद्रकिनारी थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी हजारोच्या संख्येने पर्यटक दाखल झाले होते. पुण्यात वास्तव्य करणारे सहस्रबुद्धे हे देखील आपल्या मित्रांसोबत काशीद समुद्रकिनारी नव वर्षाचे स्वागत करण्याच्या उद्देशाने आले होते. मंगळवारी दुपारच्या सुमारास प्रतीक प्रकाश सहस्रबुद्धे (३१) समुद्राच्या पाण्यात पोहण्यास गेला असता त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही आठवड्यातील दुसरी घटना असल्याने पुन्हा एकदा पर्यटकांचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुरूड - जंजिरा येथील काशीद समुद्रकिनारी नव वर्षाच्या स्वागतासाठी पुण्यातून प्रतीक प्रकाश सहस्रबुद्धे, गणेश नितीन सहस्रबुद्धे,रिक्षाचालक शदाब अविद मलीक, राकेश राजू पवार हे चौघे जण फिरण्यास आले होते. मंगळवारी दुपारच्या दरम्यान चौघे मित्र समुद्राच्या पाण्यात पोहण्यास उतरले होते. पोहून झाल्यानंतर स्पोर्ट बाईकवर फिरण्याचा बेत ठरला. त्यासाठी प्रतीकचे मित्र बाहेर आले मात्र प्रतीक पाण्यातच पोहत राहिला. दीड तासानंतर प्रतीक सहस्रबुद्धे हा पाण्यात तरंगत असल्याचे लाईफ गार्ड यांना दिसून आले. त्यावेळी ताबडतोब पोलीस आणि गार्डच्या मदतीने प्रतीकला बाहेर काढण्यात आले. परंतु प्रतीक हा प्रतिसाद देत नसल्याने त्यास पोलिसांनी ताबडतोब मुरूड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्याचा आधीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या संदर्भात मुरूड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.