'समृद्धी'वर संस्कृती संवर्धनाचा अनोखा प्रयत्न; ठाणे-नाशिकला जोडणाऱ्या बोगद्यांवर झळकली ऐतिहासिक वारली चित्रकला व लोकसंस्कृती

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा आमने ते इगतपुरी दरम्यानचा ७६ कि.मी लांबीचा शेवटचा टप्पा वाहतुकीसाठी लवकरच सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे.
'समृद्धी'वर संस्कृती संवर्धनाचा अनोखा प्रयत्न; ठाणे-नाशिकला जोडणाऱ्या बोगद्यांवर झळकली ऐतिहासिक वारली चित्रकला व लोकसंस्कृती
Published on

मुंबई : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा आमने ते इगतपुरी दरम्यानचा ७६ कि.मी लांबीचा शेवटचा टप्पा वाहतुकीसाठी लवकरच सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे. या टप्प्यातील ठाणे व नाशिक जिल्ह्याला जोडणाऱ्या बोगद्यांवर ऐतिहासिक स्थानिक वारली लोकसंस्कृतीची मुद्रा उमटवून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने संस्कृती संवर्धनाचा एक अनोखा प्रयत्न केला आहे. अशा प्रकारे बोगद्यावर चित्रकला रेखाटण्याचा राज्यातील हा पहिलाच अनोखा प्रयत्न आहे.

शेवटच्या ७६ कि.मी टप्प्याचे काम पूर्ण, राज्यातील अभियांत्रिकी आविष्कार असणाऱ्या सर्वाधिक लांबीच्या बोगद्याच्या समावेश

समृद्धी महामार्गाच्या ७०१ कि.मी लांबीपैकी ६२५ कि.मी लांबीचा महामार्ग सध्या वाहतुकीस सुरू असून आतापर्यंत दीड कोटीहून अधिक वाहनधारकांनी समृद्धी महामार्गाचा वापर केला आहे. आता, इगतपुरी ते आमने या ७६ कि.मी टप्प्यातील अभियांत्रिकी काम पूर्ण झाले आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून खडतर मार्ग काढत महाराष्ट्र राज्य रस्ते महामंडळाने अभियांत्रिकी आव्हान समर्थपणे पेलले आहे. या टप्प्यांमध्ये एकूण पाच बोगदे असून एकूण लांबी ११ कि.मी आहे. त्यात इगतपुरी येथील ७.७८ कि.मी लांबीचा बोगदा हा महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा आहे. या बोगद्यामुळे इगतपुरी ते कसारा हे अंतर आता अंदाजे आठ मिनिटांमध्ये पार करता येणार आहे. पुढील काही महिन्यात या बोगद्यामधून सर्वसामान्यांना प्रवास करता येणार आहे.

निसर्गरम्य परिसराला ऐतिहासिक वारली लोकसंस्कृतीची आणि स्थानिक लोकजीवनाची जोड

समृद्धी महामार्गावरून ठाणे जिल्ह्यातील आमने इंटरचेंजहून नेत्रसुखद प्रवासाची अनुभूती देण्यासाठी महामंडळाने बोगद्यांवर स्थानिक लोककलेची मुद्रा उमटवली आहे. डोंगर-दऱ्या व निसर्गाने नटलेल्या ठाणे व नाशिक जिल्ह्यातून गेलेल्या समृद्धी महामार्गाच्या बोगद्यांवरील ही कलाकुसर अधिकच भर टाकत आहे. साधारणपणे एक ते दीड महिन्याचा कालावधी बोगद्यांवर चित्र रेखाटण्यासाठी लागला आहे. समृद्धी महामार्गावरील इतर टप्प्यातील विविध उपाययोजनांप्रमाणेच, या अत्यंत सुंदर कलाकृतीमुळे समृद्धी महामार्गावर प्रवास करताना वाहन चालकांना मग्न करणाऱ्या प्रवासाचा परिणाम कमी होण्यास मदत होणार आहे.

'ऐतिहासिक अशा स्थानिक वारली लोककलेचा जाणीवपूर्वक विचार करण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यातील वारली चित्रकला प्राधान्याने कसारा येथील बोगद्यावर रेखाटली आहे. त्याचप्रमाणे इगतपुरी बोगद्यावर विपश्यनेचे महत्त्व, पर्यटन तसेच इतर बोगद्याजवळील भिंतीवर स्थानिक लोकजीवन, शेती व्यवसाय आदी चित्रे रेखाटली आहेत. ऐतिहासिक वारली लोकसंस्कृती तसेच स्थानिक लोकजीवन रेखाटून संस्कृती संवर्धनाचा एक वेगळा प्रयत्न महामंडळाने केला असल्याचे महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिलकुमार गायकवाड यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in