कराड : भारतीय उपखंडातील सर्वात लहान अतिविषारी व दुर्मिळ साप म्हणून ओळख असलेला असा 'पोवळा' साप माण तालुक्यातील गोंदवले बुद्रुकमध्ये आढळल्याने याबाबतची उत्सुकता वाढली आहे.
गोंदवले बुद्रुक येथील शार्दुल कट्टे यांच्या स्टीलच्या दुकानाजवळ हा साप आढळला.(Slender Coral Snake)असे त्याचे शास्त्रीय नाव असले तरी या सापास मराठीमध्ये 'पोवळा' साप' असे म्हटले जाते. सापाची ही प्रजाती अतिशय दुर्मिळ पण अत्यंत विषारी आहे. माण तालुक्यातील कायम दुष्काळी पठारी प्रदेशात प्रथमच हा साप आढळून आला असल्याचे बोलले जात आहे. तो करंगळी एवढा जाड असतो. जर हा साप घाबरला, तर आपली शेपटी गोल करून ती जमिनीवर आपटून आपल्या जवळ येऊ नका,असा इशारा देतो.
पोवळा हा वाळ्या सारख्या दिसणारा व वाळ्यापेक्षा काहीसा मोठा साप आहे.या सापाचे विष मज्जा संस्थेवर गंभीर परिणाम करत असल्यामुळे चावल्यास सूज, चक्कर, बेशुद्ध पडणे व प्रसंगी तात्काळ उपचार मिळाले नाही तर मृत्यू देखील होतो.