पुण्यात मतदान जागृतीच्या फलकाची ‘तोडफोड’, प्रतिष्ठित अशा गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेच्या आवारात लोकशाहीविरोधी छेडछाड

गोखले संस्थेतील इलेक्टोरल लिटरसी क्लब अँड आर्ट क्लब यांच्यातर्फे वॉल ऑफ डेमोक्रेसी तयार करण्यात आली होती. या फलकावर मतदारासंदर्भात जनजागृती करण्यात आली होती. त्यावर स्वाक्षऱ्यांसाठीही जागा ठेवण्यात आली.
पुण्यात मतदान जागृतीच्या फलकाची ‘तोडफोड’, प्रतिष्ठित अशा गोखले राज्यशास्त्र  आणि अर्थशास्त्र संस्थेच्या आवारात लोकशाहीविरोधी छेडछाड

पुणे : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वत्र विविध माध्यमातून मतदान जागृती केली जात आहे. मात्र, पुण्यातील प्रतिष्ठित गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेतून अशा प्रकारे मतदान जागृतीचा फलक लावलेला असताना एक धक्कादायक प्रकार दिसून आला. मतदान जागृतीसाठी लावलेल्या फलकावर ‘इन्कलाब झिंदाबाद’, ‘नोटा’ लिहिले गेले आहे. त्यामुळे वातावरण तापले असून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने गुरुवारी आंदोलन केले.

गोखले संस्थेतील इलेक्टोरल लिटरसी क्लब अँड आर्ट क्लब यांच्यातर्फे वॉल ऑफ डेमोक्रेसी तयार करण्यात आली होती. या फलकावर मतदारासंदर्भात जनजागृती करण्यात आली होती. त्यावर स्वाक्षऱ्यांसाठीही जागा ठेवण्यात आली. निवडणूक आयोग, भारत सरकार, विद्यापीठ अनुदान आयोग यांचे लोगो लावण्यात आले. याच बोर्डावर हे लिहिल्याचे दिसून आहे.

हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर अनेक प्रतिक्रिया उमटल्या. या पोस्टरमध्ये गोखले इन्स्टिट्यूटचा व इलेक्शन कमिशनचा लोगो वापरून नोटा या पर्यायाला मतदान करा अशा पद्धतीचा मजकूर आढळून आला. हे बॅनर इन्स्टिट्यूटमध्ये गेले दोन-तीन दिवस असूनही त्यावर प्रशासनाकडून कोणत्याही पद्धतीची कारवाई झाली नाही. ही छेडछाड करणाऱ्यांविरोधात जर लवकरात लवकर कारवाई केली नाही तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणखी तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल, असा इशारा यावेळी अभाविपच्या वतीने देण्यात आला.

ही घटना साधारण ३६ तासांपूर्वी घडली आहे. ही घटना समोर आली त्यावेळी आमच्या संस्थेकडून सीसीटीव्ही चेक करण्यात आले. त्यात दोन विद्यार्थ्यांना पकडण्यात आले आहे. त्या विद्यार्थ्यांनी माफी मागितली असून त्यांची चौकशी करत आहोत, असे गोखले संस्थेचे उपकुलगुरू अजित रानडे यांनी सांगितलं.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in