कराडात भरदिवसा युवकाची हत्या

शनिवारी दुपारी साडे तीनच्या सुमारास ही घटना घडली असून, संशयित हल्लेखोर फरार झाले आहेत
कराडात भरदिवसा युवकाची हत्या

कराड : गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगारी वृत्तींच्या गुंडांचे कंबरडे पोलिसांनी मोडून काढल्याने कराड शहर व परिसरात गेली अनेक दिवसांपासून शांत होते; मात्र पोलिसांच्या गाफीलतेचा फायदा घेत याच गुंडांनी पुन्हा आपले डोकेवर काढले असून, कराड शहरातून जात असलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील शहरातील कार्वेनाका परिसरात शनिवारी भरदिवसा युवकावर एकाने चाकूने सपासपा वार करून त्याचा खून केला. शनिवारी दुपारी साडे तीनच्या सुमारास ही घटना घडली असून, संशयित हल्लेखोर फरार झाले आहेत. खुनाचे कारण अद्याप समजू शकले नाही. शुभम रविंद्र चव्हाण असे खून केलेल्या युवकाचे नाव आहे. शुभम हा शहरातील एका सलून मध्ये काम करत होता, तर शुभमवर हल्ला करणारा युवकाचेही कार्वे नाका परिसरात दुकान असल्याचे समजते.

कराड शहरातून जात असलेल्या गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील शहराच्या प्रवेशद्वारावरील येथील कार्वे नाका येथे शनिवारी दुपारी साडेतीन वाच्या सुमारास शुभम चव्हाण हा तेथील ऑलिम्पिकवीर स्व. पै. खाशाबा जाधव स्मारक चौकात उभा होता. यावेळी एकजण त्याच्याजवळ आला व काही कळण्याच्या आतच त्याने बेसावध असलेल्या शुभमवर धारदार चाकूने सपासपा वार केल्याने तो गतप्राण होत जागीच कोसळला; मात्र यावेळी शुभमच्या ओरडण्याने आजूबाजूचे लोक मदतीसाठी धावले असता, अज्ञात हल्लेखोराने तेथून पलायन केले.

logo
marathi.freepressjournal.in