
मुंबई : विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आणि निवडणुकीआधी अंमलबजावणीला सुरुवात झाली. मात्र लाडकी बहीण योजनेवरुन मविआच्या नेत्यांनी महायुती वर टीकेची झोड उठवली आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुका तोंडावर आल्या असून निवडणुकीनंतर या योजनेतील बहिणींना अपात्र ठरवत योजना बंद होणार, असा घणाघात शिवसेना आमदार युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केला आहे. दरम्यान, लाडकी बहीण योजना बंद होणार नसून अपात्र बहिणींना योजनेचा लाभ यापुढे मिळणार नसल्याचे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.
विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा महायुतीने केली आणि महायुती मविआ नेत्यांच्या निशाण्यावर आली आहे. लाडकी बहीण फसवी योजना असल्याची टीका मविआच्या नेत्यांनी केली. मात्र विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पैसे जमा झाले आणि महायुतीच्या नेत्यांनी मविआवर निशाणा साधला. आता आगामी मुंबई महापालिका, महापालिका, नगर पालिकेच्या निवडणुका पार पडणार आहेत. आगामी मुंबई महापालिका निवडणुका पार पडल्या की, लाडक्या बहिणी योजनेतील बहिणींना अपात्र ठरवायचे, असे माझे गणित असल्याचे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.
राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार आल्यापासून लाडकी बहीण योजनेचे पैसे राज्य सरकार परत घेणार असल्याची टीका विरोधक करत आहेत. परंतु अपात्र बहिणींचे पैसे परत घेणार नाही. मात्र अपात्र ठरलेल्या बहिणींना पुढे या योजनेचा लाभ घेत येणार नाही, असे स्पष्टीकरण महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले आहे.
तसेच कोणत्याही लाडक्या बहिणींना त्यांचे कागदपत्र जाऊन मागितले नाहीत किंवा पडताळणीसाठी त्यांच्या घरी गेलो नाही. ज्या भागातून तक्रारी आल्या तिथेच फेरतपासणी झाली. कुठेही सरसकट फेरतपासणी झाली नाही, असेही त्या म्हणाल्या.
लाडकी बहीण योजनेंतर्गत बहिणींना अपात्र ठरवायचे आणि त्यांचे पैसे कमी करायचे आहेत. महापालिका निवडणुकीनंतर भाजप सरकार अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढवेल आणि खात्यातून पैसे परत घेतील आणि त्यानंतर ही योजना बंद करतील,
- आदित्य ठाकरे