भारताने पाकिस्तानसोबत खेळायलाच हवे का? आदित्य ठाकरेंची सुरक्षा यंत्रणेवर टीका

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या वातावरणात भारताने आशिया कप क्रिकेट आणि हॉकी स्पर्धांमध्ये पाकिस्तानसोबत सामने खेळावेत का, असा सवाल शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी उपस्थित केला.
भारताने पाकिस्तानसोबत खेळायलाच हवे का? आदित्य ठाकरेंची सुरक्षा यंत्रणेवर टीका
Published on

मुंबई : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या वातावरणात भारताने आशिया कप क्रिकेट आणि हॉकी स्पर्धांमध्ये पाकिस्तानसोबत सामने खेळावेत का, असा सवाल शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी उपस्थित केला.

विधान भवनाच्या आवारात पत्रकारांना त्यांनी सांगितले की, देशाच्या सुरक्षेच्या संदर्भात अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत.

जेव्हा पाकिस्तान आपल्या विरोधात दहशतवादाला पाठबळ देतो आहे, तेव्हा त्याच्याशी सामने खेळणे योग्य आहे का? भारतीय संघाने आशिया कप क्रिकेट आणि हॉकी स्पर्धांमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळले पाहिजे का, याबाबत भाजप आणि केंद्र सरकारने स्पष्ट उत्तर द्यावे, असे ठाकरे म्हणाले.

भाजप नेतृत्वाखालच्या सरकारकडून आशिया कप हॉकी स्पर्धेच्या माध्यमातून जनमताचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे, असेही ते म्हणाले.

ही स्पर्धा बिहारमध्ये आयोजित केली जाणार आहे. त्यानंतर आशिया कप क्रिकेट स्पर्धा यूएईमध्ये खेळवली जाण्याची शक्यता आहे.

सरकारने दिलेल्या प्रतिसादावर नाराजी

पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर केंद्र सरकारने दिलेल्या प्रतिसादावर आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या हाताळणीवरही ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. सुरुवातीला पोलिसांनी आरोपीचा स्केच जारी केला. मात्र नंतर एनआयएने तो बनावट ठरवला. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सरकारने प्रतिनिधी मंडळे विविध देशांत पाठवली. जणू काही घडलेच नाही. हीच का राष्ट्रीय सुरक्षा, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

logo
marathi.freepressjournal.in