‘आई’ योजनेने महिलांसाठी उघडली रोजगाराची नवी दारे; ८०० महिला उद्योजकांना ५५ कोटींचे बिनव्याजी कर्ज

पर्यटनाशी निगडित व्यवसायात महिलांनी पुढाकार घ्यावा, यासाठी केंद्र सरकार पुरस्कृत 'आझादी का अमृत महोत्सव' (आई) योजनेची राज्य सरकारच्या पर्यटन विभागाने अंमलबजावणी सुरू केली आहे. या योजनेंतर्गत महिला उद्योजकांना बिनव्याजी १५ लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करण्यात येत आहे.
‘आई’ योजनेने महिलांसाठी उघडली रोजगाराची नवी दारे; ८०० महिला उद्योजकांना ५५ कोटींचे बिनव्याजी कर्ज
Published on

मुंबई : पर्यटनाशी निगडित व्यवसायात महिलांनी पुढाकार घ्यावा, यासाठी केंद्र सरकार पुरस्कृत 'आझादी का अमृत महोत्सव' (आई) योजनेची राज्य सरकारच्या पर्यटन विभागाने अंमलबजावणी सुरू केली आहे. या योजनेंतर्गत महिला उद्योजकांना बिनव्याजी १५ लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करण्यात येत आहे. यासाठी राज्यातून तब्बल २,५६८ महिलांनी अर्ज केला असून त्यापैकी ८०० महिला उद्योजकांसाठी पर्यटन विभागाने बँकांना हमीपत्र दिले आहे. हमीपत्र दिल्यानंतर ५५ कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या ५५ कोटींचे १ कोटी रुपये व्याज पर्यटन विभागाने बँकेत जमा केल्याची माहिती पर्यटन विभागाचे संचालक बी. एन. पाटील यांनी दिली.

केंद्र सरकार पुरस्कृत आई ही महिला पर्यटन केंद्र आधारित योजना राज्य सरकारने गेल्या वर्षभरापासून राबवण्यास सुरुवात केली आहे. या योजनेंतर्गत राज्यात पर्यटन उद्योगाला चालना देण्यासाठी पर्यटन उद्योगाशी निगडित ४५ उद्योग सुरू करण्यासाठी महिलांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. यानुसार महिलांनी कृषी पर्यटनापासून प्रवासी वाहतूक, हस्तकला, वस्तू विक्री, स्थानिक खाद्य व्यवसाय अशा विविध क्षेत्रांत महिला आता स्वतःचे उद्योग सुरू करण्यासाठी संबंधित विभागाकडून योजनेंतर्गत १५ लाख रुपयांचे कर्ज देण्यात येत आहे. या कर्जावरील व्याजाचा पूर्ण परतावा पर्यटन विभागामार्फत दिला जात असून महिलांना १५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज बिनव्याजी मिळत आहे. विनातारण कर्ज मिळत असल्याने अनेक महिला आत्मविश्वासाने उद्योग क्षेत्रात आल्या आहेत. त्यामुळे या योजनेला राज्यभरातील महिलांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून केवळ दीड वर्षाच्या कालावधीत २५६८ महिलांचे अर्ज आले होते. त्यापैकी २ हजार अर्जांना मान्यता दिली पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, राज्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. त्यातून रोजगार निर्मिती व्हावी या धोरणातून सरकारने आई योजना आणली असून महिलांना या योजनेचा फायदा होत आहे.

या विभागातून आले अर्ज

आई योजनेंतर्गत पुणे विभागातून सर्वाधिक १०४७ अर्ज प्राप्त झाले आहेत, तर कोकणमधून ४३१, नाशिक ३०१, छत्रपती संभाजीनगर ५१७, अमरावती १८३ आणि नागपूर ८९ अर्ज प्राप्त झाले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in