
नवी दिल्ली : १९१३ साली ‘राजा हरिश्चंद्र’ हा चित्रपट प्रदर्शित करून भारतीय सिनेसृष्टीची मुहूर्तमेढ मराठमोळ्या दादासाहेब फाळके यांनी रोवली. या दादासाहेबांच्या जीवनाची चित्तरकथा व चित्रपट बनवण्याची कहाणीही रोचक आहे. ‘बायोपिक’द्वारे ही कहाणी पडद्यावर आणण्याचे ज्येष्ठ अभिनेता आमिर खान व नामवंत दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी ठरवले आहे.
भारतीय सिनेमाचे जनकत्व दादासाहेब फाळके यांच्याकडे जाते. अत्यंत खडतर परिस्थितीत फाळके यांनी चित्रपट व्यवसाय सुरू केला. तोच इतिहास पडद्यावर आणला जाणार आहे.
‘थ्री इडियट्स’ आणि ‘पीके’सारखे ब्लॉकबास्टर चित्रपट देणारे आमिर खान आणि राजकुमार हिरानी हे दादासाहेब फाळके यांचे जीवन पडद्यावर आणणार आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण यंदाच्या ऑक्टोबरपासून सुरू होईल.
स्वातंत्र्यपूर्व काळातील ही कथा आहे. शून्यातून या व्यक्तीने सुरुवात करून अत्यंत कठीण परिस्थितीत जगातील सर्वात मोठ्या चित्रपट उद्योगाचा पाया रचला.
‘सितारे जमीन पर’ या आगामी चित्रपटानंतर आमिर खान हे या नवीन चित्रपटातील आपल्या भूमिकेची तयारी करायला सुरुवात करणार आहेत. या चित्रपटातील काळ दाखवण्यासाठी ‘व्हीएफएक्स’चे काम सुरू झाले आहे. राजकुमार हिरानी, अभिजात जोशी, हिंदुकुश भारद्वाज आणि अविष्कार भारद्वाज हे या चित्रपटाची पटकथा चार वर्षांपासून लिहित आहेत. आमिर व राजू हिरानी हे हा चित्रपट करत असल्याने तो भव्य बनण्याची दाट शक्यता आहे.
दादासाहेबांच्या नातूकडून हिरवा कंदील
दादासाहेब फाळके यांचे नातू श्रीकृष्ण पुसाळकर यांनी या चित्रपटाला हिरवा कंदील दाखवला आहे. त्यांनी फाळके यांच्या जीवनातील घटना व माहिती चित्रपटकर्त्यांना दिली आहे.