
छत्रपती संभाजीनगर : ‘आस्था फाउंडेशन, छत्रपती संभाजीनगर’ यांच्या वतीने आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा ‘उद्योन्मुख आव्हाने आणि उपाय’ वृद्धाश्रम व ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेत कार्यरत संस्थांसाठी यशस्वीपणे पार पडली. एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आनंद सभागृहात पार पडलेल्या या कार्यशाळेत महाराष्ट्रातील ५० हून अधिक वृद्ध सेवा संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
कार्यशाळेचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री आणि जागतिक विचारवंत सुरेश प्रभू यांच्या हस्ते झाले. आपल्या उद्घाटनपर भाषणात त्यांनी वृद्धांसाठी आजच्या आणि भविष्यकालीन काळात वृद्धाश्रमाची गरज अधोरेखित केली. “वृद्धाश्रम ही आजची आणि भविष्यातील गरज आहे," असे ते म्हणाले. केवळ औषधे आणि यंत्रेच नव्हे, तर वृद्धांसाठी भावनिक सुरक्षाही तितकीच गरजेची आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. संस्थांनी एकमेकांच्या चांगल्या वाईट अनुभवातून शिकून सेवेसाठी एकत्र येणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांनी गुरुकुल संकल्पनेच्या धर्तीवर वृद्धांसाठी भावनिक आधार देणारी व्यवस्था उभी करण्याचे आवाहन केले. ज्येष्ठांची सेवा ही केवळ एक सेवा नसून आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे. ही आपली सामूहिक जबाबदारी आहे,” असे प्रतिपादन त्यांनी व्यक्त केले.