सिंहगड एक्स्प्रेसमधून मुलीच्या अपहरणाचा डाव फसला; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून शाबासकी

सिंहगड एक्स्प्रेसने पुण्याला कोर्ट कामासाठी जात असताना त्यांना रेल्वेच्या डब्यात ३० वर्षीय इसम एका ८ वर्षीय मुलीला घेऊन प्रवास करत असताना दिसला.
सिंहगड एक्स्प्रेसमधून मुलीच्या अपहरणाचा डाव फसला; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून शाबासकी
Published on

मुंबई : ‘सद्‌रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीद आपल्या कर्तव्यबुद्धीने जपणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक बलभीम ननवरे यांचा मंगळवारी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोन्हे यांनी विधानभवनातील त्यांच्या दालनात पुष्पगुच्छ, शाल आणि अभिनंदन पत्र देऊन सन्मान केला.

काही दिवसांपूर्वी सिंहगड एक्स्प्रेसने पुण्याला कोर्ट कामासाठी जात असताना त्यांना रेल्वेच्या डब्यात ३० वर्षीय इसम एका ८ वर्षीय मुलीला घेऊन प्रवास करत असताना दिसला. ननवरे यांच्या नजरेतून या ३० वर्षीय इसमाच्या संशयास्पद हालचाली सुटल्या नाहीत, मुलगी मराठीमध्ये बोलत होती तर तो इसम हिंदीमधून बोलत होता. ननवरे यांनी आपल्या पोलीस स्टाइलने खाक्या दाखवताच, तो ३० वर्षीय इसम म्हणजे दयानंदकुमार शर्माने ही आपली मुलगी असल्याचे सांगितले. मात्र मुलीला आपल्या मामाचा मोबाईल नंबर तोंडपाठ असल्याने ननवरे यांचे काम सोपे झाले.

त्यांनी तत्काळ मुलीचे मामा सचिन शेलार यांच्याशी संपर्क साधला. मामांनी आपल्या बहिणीशी संपर्क साधून माहिती घेतली आणि ननवरे यांना आपली भाची पळवून नेली जात असल्याचे तत्काळ कळविले. मामांना पुणे स्टेशनवर बोलावण्यात आले आणि आरोपी शर्मा यांचा मुलीस पळवून नेण्याचा डाव सतर्कतेमुळे उधळला गेला. याबाबत डॉ. गोन्हे यांनी ननवरे यांनी केलेल्या सन्माननीय कामाबाबत लेखी अभिनंदनाचे पत्रही लिहिले. यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी आपल्या मुलांबाबत पालकांनी जागरूक रहावे व अनोळखी व्यक्तीसोबत त्यांना शाळेत अथवा घराबाहेर पाठवू नये, असे आवाहनही केले आहे.

logo
marathi.freepressjournal.in