

छत्रपती संभाजीनगर : कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शैक्षणिक पदवीवरून पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. मोदींनी आपली पदवी सार्वजनिक केल्यास, आपणही अमेरिकेतील शिक्षणासाठी मिळालेले शिष्यवृत्ती पत्र आणि शैक्षणिक कर्जाची कागदपत्रे दाखवण्यास तयार असल्याचे दीपके यांनी सोमवारी येथे स्पष्ट केले.
सुरत येथील एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने दीपके यांच्या वडिलांच्या (जे एक निवृत्त शासकीय कर्मचारी आहेत) आर्थिक व्यवहारांची आणि दीपके यांच्या परदेशी शिक्षणाच्या खर्चाची चौकशी करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी ते बोलत होते. दीपके म्हणाले, मी माझ्या शिष्यवृत्तीचे आणि शैक्षणिक कर्जाचे पत्र सार्वजनिक करण्यास पूर्णपणे तयार आहे. पण मोदी त्यांची पदवी दाखवणार का, मी अमेरिकेतील बोस्टन युनिव्हर्सिटीकडून मिळालेली शिष्यवृत्ती आणि बँकेच्या शैक्षणिक कर्जाच्या माध्यमातून तेथे शिक्षण पूर्ण केले आहे. या कर्जाची परतफेड मला करायची आहे. या प्रकरणी कोणालाही तपास करायचा असल्यास ते मोकळे आहेत.
पदवी अधिकृत
माझी पदवी पूर्णपणे अधिकृत आणि खरी आहे, मोदींची पदवीही तशीच खरी असेल, अशी मी अपेक्षा करतो. जेव्हा जेव्हा लोक या सरकारच्या विरोधात आवाज उठवतात, तेव्हा त्यांच्यामागे ईडी आणि सीबीआय लावली जाते. त्यांनी माझ्याही घरी येऊन खुशाल तपास करावा. परंतु, पंतप्रधानांनी जर ईडी पाठवली तर त्यांनी सोबत आपली पदवीही पाठवून ती सार्वजनिक करावी. कॉक्रोच जनता पार्टीचे रूपांतर राजकीय पक्षात होणार का, या प्रश्नावर दिपके म्हणाले, सध्याच्या राजकीय पक्षांमुळे प्रसारमाध्यमे आणि जनता दोघेही निराश झाले आहेत. आमचा सध्या तरी कोणताही राजकीय पक्ष स्थापन करण्याचा इरादा नाही.
सीजेपीच्या विस्ताराची योजना
सीजेपीच्या भावी रणनीतीबाबत बोलताना दीपके यांनी सांगितले की, ५ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथे संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत पुढील वाटचाल आणि विस्ताराची रूपरेषा निश्चित केली जाईल.
आपल्याकडे म.गांधींचा वारसा
भारतात महात्मा गांधींचा महान वारसा आहे आणि त्यांच्यापासून जगभरातील लोक प्रेरण घेतात. त्यामुळे देशातील आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना बांगलादेश किंवा नेपाळकडे पाहण्याची अजिबात गरज नाही, असे ठाम प्रतिपादन सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी सोमवारी केले. जंतर-मंतर येथील सीजेपीच्या आंदोलनाची तुलना बांगलादेशातील शेख हसिना सरकारविरुद्ध झालेल्या हिंसक आंदोलनाशी करणाऱ्या बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांच्या वक्तव्याचा दीपके यांनी खरपूस समाचार घेतला. बांगलादेश आणि नेपाळमधील हिंसक आंदोलनांचे दाखले देऊन आमच्या आंदोलनाला आणि चळवळीला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, आमची भूमिका पूर्णपणे वेगळी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
पक्ष काढणार नाही
ही एक लोकचळवळ म्हणूनच पुढे चालवण्याची आमची इच्छा आहे. निवडणूक आणि राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना ते म्हणाले, जेव्हा मतांची चोरी होते, तेव्हा राजकीय पक्ष काढून तरी काय उपयोग, लोक सकाळी एकाला मतदान करतात आणि संध्याकाळी दुसऱ्याचेच सरकार स्थापन होते, ज्यामुळे लोकांचा राजकारणावरील विश्वास उडाला आहे. आमदार-खासदार एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारतात आणि ईडी-सीबीआयचा धाक दाखवून पक्ष फोडले जातात. अशा स्थितीत राजकीय पक्ष स्थापन करण्यात काहीच अर्थ उरत नाही.