

नागपूर : ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दीपके यांनी मंगळवारी त्यांची संघटना निवडणूक लढवण्यास उत्सुक नसल्याचे संकेत दिले. तसेच, ‘नीट-यूजी’ गोंधळाच्या पार्श्वभूमीवर देशातील विद्यार्थ्यांशी संपर्क न साधल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कडाडून टीकाही केली. दरम्यान, आपल्यावर सोमवारी झालेल्या हल्ल्यामागे ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’चे (आरएसएस) काही लोक असल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी केला.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी ‘सीजेपी’तर्फे नागपूर शहरात आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत दीपके बोलत होते. ‘सीजेपी’ निवडणूक लढवणार का, असे विचारले असता दीपके म्हणाले, आम्ही निवडणूक का लढवावी, म्हणजे, या देशातील प्रत्येकाला आपले हक्क मागण्यासाठी निवडणूकच लढवावी लागली, तर हे कसे चालेल, असे ते म्हणाले.
मोदींनी माफी मागावी
पंतप्रधानांनी देशातील तरुणांना संबोधित करून यापुढे पेपरफुटी होणार नाही, अशी ग्वाही द्यायला हवी का, या प्रश्नावर दीपके म्हणाले की, पंतप्रधानांनी सर्वप्रथम (३ मे रोजी होणारी ‘नीट-यूजी’ परीक्षा रद्द झाल्यानंतर) आत्महत्या केलेल्या पाच ते सहा विद्यार्थ्यांच्या पालकांची माफी मागितली पाहिजे. जगात कुठेही काहीही घडले तरी पंतप्रधान तातडीने ट्विट करतात. मात्र, इथे देशातील विद्यार्थी आत्महत्या करत आहेत आणि पंतप्रधानांकडून त्यांच्यासाठी साधे एक शोक ट्विटही केले जात नाही.
आंदोलन सुरूच राहणार
तुम्ही किती काळ फक्त स्वतःच्या 'मन की बात' आणि 'परीक्षा पे चर्चा'बद्दल बोलत राहणार, कधीतरी विद्यार्थ्यांच्या मनातील बातही ऐकून घ्या, पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यास त्यांना विद्यार्थ्यांच्या समस्या समजतील आणि त्यावर तोडगा काढता येईल, असेही दीपके यांनी म्हटले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान जोपर्यंत राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत ‘सीजेपी’चे देशभरातील आंदोलन थांबणार नाही, असा पुनरुच्चार त्यांनी केला.
नागपुरात बंदोबस्त
'नीट' पेपरफुटी घोटाळ्यावरून नागपूरमध्ये होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. या आंदोलनात २००० हून अधिक तरुण सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात असून, खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.