

मुंबई : 'कॉकरोच जनता पार्टी' चे संस्थापक अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखालील तीव्र आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. या घडामोडीनंतर गेल्या अनेक महिन्यांपासून चिंतेच्या सावटाखाली जगणाऱ्या अभिजित यांच्या पालकांनी अखेर सुटकेचा निःश्वास सोडला असून त्यांच्या घरात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
मी आता त्याला लवकरात लवकर घरी येण्यास सांगेन. तो आला नाही, तर आम्ही स्वतः जाऊन त्याला घेऊन येऊ. घरी आल्यावर मी त्याला घट्ट मिठी मारेन आणि त्याची आरती ओवाळेन. गेल्या वेळी तो जेव्हा घरी आला होता, तेव्हा मी मोठा माणूस नाहीये. असे सांगत त्याने आरती ओवाळू दिली नव्हती. असे सांगताना अभिजित यांच्या आई अनिता दीपके यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
आपल्या घरी छत्रपती संभाजीनगरमधील पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, आज त्याच्या प्रामाणिकपणाचा विजय झाला आहे. तरुणांच्या भक्कम पाठिंब्यामुळेच त्याला हा मोठा विजय मिळवता आला. जंतरमंतर येथे आंदोलन सुरू झाल्यानंतर आपल्याला रात्ररात्र झोप येत नव्हती, अशी आठवण अनिता दीपके यांनी सांगितली.
अभिजीत यांचे वडील भगवानराव दीपके यांनी सांगितले की, सुरुवातीच्या दिवसांत भीती आणि दबावामुळे आम्ही घर सोडून कोकणात जाऊन राहिलो होतो. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मोठ्या पदाचा राजीनामा देऊन मोठेपण दाखवले आहे. याकडे कोणाचा विजय किंवा पराभव म्हणून पाहू नये.
अभिजीत यांनी यापूर्वी आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्यासोबत काम केले असून त्यांनी राजकारण जवळून पाहिले आहे. मला वैयक्तिकरित्या राजकारण आवडत नाही, त्यामुळे तो पुढे काय करेल हे मला माहीत नाही; पण मी नेहमी त्याच्या पाठीशी उभा राहीन, असे सांगत अभिजीतने आता घरी परत यावे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.