अभिजीत पानसे यांची उमेदवारी विचार करूनच जाहीर- बाळा नांदगावकर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्थ पाठिंबा दिला असतानाही पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मनसेने अभिजीत पानसे यांची उमेदवारी जाहीर केली आहे...
अभिजीत पानसे आणि राज ठाकरे यांचे संग्रहित छायाचित्र
अभिजीत पानसे आणि राज ठाकरे यांचे संग्रहित छायाचित्र
Published on

ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्थ पाठिंबा दिला असतानाही पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मनसेने अभिजीत पानसे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर राजकीय वर्तुळात महायुतीबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. याबाबत मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रतिक्रिया दिली असून अभिजीत पानसे यांची उमेदवारी विचार करूनच जाहीर करण्यात आली असल्याचे सूचक विधान त्यांनी केले आहे. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पुढची गणिते अवलंबून असून मनसेने विधानसभेची तयारी आधीच सुरू केल्याचे नांदगावकर यांनी स्पष्ट केले आहे.

कोकण पदवीधर मतदारसंघासाठी मनसेच्या वतीने अभिजीत पानसे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. या मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान आमदार निरंजन डावखरे असून महायुतीला मनसेचा पाठिंबा असताना पानसे यांची उमेदवारी कशी जाहीर करण्यात आली असा प्रश्न राजकीय वर्तुळात सुरू झाला आहे. एका खासगी कामानिमित्त मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी पालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी कोकण पदवीधर मतदार संघाविषयी आपली भूमिका स्पष्ट केली.

प्रत्येक पक्ष वेगवेगळा असतो, आम्ही महायुतीत जरी असलो तरी हा पक्षाचा विषय आहे, आम्ही उमेदवारी जाहीर केली असेल तर काही तरी विचार करुन जाहीर केली असेल असे नांदगावकर यांनी सांगितले.

महायुतीचा उमेदवार असला तरी निरंजन डावखरे यांचा मला फोन आला होता, त्यांच्याशी मी फोनवर बोलणार आहे. महायुतीच्या कोणत्याही नेत्यांशी या संदर्भात चर्चा झालेली नाही. येणाऱ्या निवडणुकांच्या जागेवर आता बोलणे उचित नाही, ४ जूननंतर निकालाची काय परिस्थिती आहे, यावर राज्याची बरीचशी गणित अवलंबून असल्याचे ते म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in