राज्यात ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’; ३ ते ९ ऑक्टोबरदरम्यान विविध कार्यक्रम

यंदाच्या वर्षी राज्य सरकारने मराठी भाषेचे संवर्धन व जनजागृतीसाठी 'अभिजात मराठी भाषा सप्ताह' साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. ३ ते ९ ऑक्टोबरदरम्यान शासकीय निमशासकीय कार्यालये, खासगी अस्थापनात मराठी भाषेची जनजागृती मोहीम राबवत शाळा, महाविद्यालय व शासकीय कार्यालयांत निबंध लेखन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : यंदाच्या वर्षी राज्य सरकारने मराठी भाषेचे संवर्धन व जनजागृतीसाठी 'अभिजात मराठी भाषा सप्ताह' साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. ३ ते ९ ऑक्टोबरदरम्यान शासकीय निमशासकीय कार्यालये, खासगी अस्थापनात मराठी भाषेची जनजागृती मोहीम राबवत शाळा, महाविद्यालय व शासकीय कार्यालयांत निबंध लेखन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या ३ ऑक्टोबर २०२४ रोजी झालेल्या बैठकीत मराठी भाषेस अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय झाला. त्यानंतर १४ ऑक्टोबर २०२४ रोजीच्या शासन निर्णयाला अनुसरून अभिजात मराठी भाषा दिवस व अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्यासाठी शासन स्तरावरून सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे आणि कार्यक्रम जाहीर केला आहे.

मराठी भाषेला अभिजात दर्जा देताना मराठी भाषेची गेल्या सुमारे २५०० वर्षांची परंपरा गृहीत धरण्यात आली आहे. प्राचीन ग्रंथांची विविध लिपीतील भाषा, व्यवहारातील व विविध कला प्रकारातील भाषेच्या उपयोगाची गौरवशाली परंपरा विविध समाज घटकांसमोर येण्यासाठी मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी, भाषेचे संवर्धन होण्यासाठी, जनमानसामध्ये मराठी भाषेच्या अभिजाततेची ओळख व्हावी, अभिजात मराठी भाषेसंदर्भातील संशोधन, जनजागृती जास्तीत जास्त व्हावी यासाठी प्रतिवर्षी ३ ऑक्टोबर हा दिवस ‘अभिजात मराठी भाषा दिवस’ व ३ ते ९ ऑक्टोबर हा कालावधी ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत सोमवारी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

असा राबवणार उपक्रम

राज्यातील सर्व शासकीय/ निमशासकीय कार्यालये/ महामंडळे, केंद्र शासनाच्या अखत्यारितील राज्यातील सर्व कार्यालये, मंडळे/ महामंडळे, सार्वजनिक उपक्रम, सर्व खासगी उद्योग, आस्थापना व व्यापारी बँका, सर्व शैक्षणिक संस्था/ विद्यापीठे/महाविद्यालये इ. सर्व संस्थांमधून अभिजात मराठी भाषेसंदर्भातील जास्तीत जास्त संशोधन, संवर्धन व जनजागृती व्हावी या हेतूने प्रतिवर्षी ३ ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा दिवस व ०३ ऑक्टोबर ते ०९ ऑक्टोबर या कालावधीत अभिजात मराठी भाषा सप्ताह म्हणून साजरा करण्यात यावा. अभिजात मराठी भाषा सप्ताहामध्ये अभिजात मराठी भाषेसंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींची व्याख्याने, चर्चासत्रे, परिसंवाद, कार्यशाळा, शिबीरे आयोजित करण्यात यावीत. अभिजात मराठी ग्रंथांची प्रदर्शने आयोजित करावीत.

‘स्लाइड शो’चे आयोजन !

शाळा/महाविद्यालयांमध्ये अभिजात मराठी ग्रंथ संपदेचे संगणकीकरण करून त्याची विद्यार्थ्यांना तोंडओळख करून द्यावी. तसेच, सदर ग्रंथांचे जतन व संवर्धन करण्याच्या पद्धतीचे चलचित्र सादरीकरण (स्लाइड शो) अथवा प्रात्यक्षिक आयोजित करण्यात यावे.

logo
marathi.freepressjournal.in