फरार माजी नगरसेवक सुनिल तेलनाडे न्यायालयात शरण खंडणी, बलात्कारासह विविध सहा गंभीर गुन्हे दाखल
इचलकरंजी : विविध पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेला आणि तब्बल साडेचार वर्ष फरारी असलेला मोक्का अंतर्गत कारवाई केलेला एस. टी. सरकार गँगमधील माजी नगरसेवक सुनिल शंकरराव तेलनाडे हा सोमवारी येथील विशेष मोका न्यायालयासमोर शरण आला. न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे. दरम्यान, जामिन संदर्भात केलेल्या सुनिल तेलनाडे याच्या अर्जावर २ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. सुनिल तेलनाडे हा न्यायालयात हजर झाल्याची माहिती समजताचा मोठ्या संख्येने तेलनाडे समर्थकांसह नागरिकांनी न्यायालय परिसरास मोठी गर्दी केली होती.
या घटनेची पार्श्वभूमी अशी, नरेंद्र भोरे व त्याचे पत्नीमधील कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी २५ लाख रुपयांची खंडणी मागत मारहाण केल्याप्रकरणी १८ मे २०१९ रोजी नरेंद्र भोरे याने शहापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती. त्या फिर्यादीवरून संजय तेलनाडे, सुनिल तेलनाडे यांच्यासह अन्य बारा जणांवर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. हा गुन्हा दाखल झाल्यापासून म्हणजे सन २०१९ पासून तेलनाडे बंधू हे फरारी झाले होते. त्यांचा पोलीस दलाकडून सर्वतोपरी शोध घेण्यात येत होता. अखेर तब्बल ३४ महिन्यांनतर फरारी संजय तेलनाडे याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले; मात्र सुनिल तेलनाडे हा फरारीच होता. सुनिल याच्यावर विविध प्रकारचे सहा गुन्हे दाखल आहेत. मोका अंतर्गत कारवाईच्या विरोधात तेलनाडे बंधूंनी उच्च न्यायालयात धावही घेतली होती.