महायुतीच्या मेळाव्याला भुजबळांची अनुपस्थिती; नाशिकमध्ये उलटसुलट चर्चा

राज्यात मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यात आंदोलन उभे केले. त्यांच्या या आंदोलनाला चांगलाच प्रतिसाद मिळाला.
महायुतीच्या मेळाव्याला भुजबळांची अनुपस्थिती; नाशिकमध्ये उलटसुलट चर्चा

विशेष प्रतिनिधी/मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात जिल्ह्याजिल्ह्यात महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्याच पद्धतीने नाशिकमध्येही महायुतीच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याकडे अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी पाठ फिरवली. त्यामुळे राज्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. विशेष म्हणजे भुजबळ रविवारी नाशिकमध्येच होते. असे असतानाही त्यांनी महायुतीच्या मेळाव्यापासून दूर राहणे पसंत केले. त्यामुळे भुजबळांच्या मनात काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

राज्यात मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यात आंदोलन उभे केले. त्यांच्या या आंदोलनाला चांगलाच प्रतिसाद मिळाला. मात्र, त्यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केल्याने मंत्री छगन भुजबळ यांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला कडाडून विरोध केला आणि ओबीसी आरक्षण बचाव एल्गार मेळाव्यातून ते राज्य पिंजून काढत आहेत. त्यामुळे जरांगे पाटील विरुद्ध भुजबळ असा संघर्ष चांगलाच पेटला आहे. अशा स्थितीत भुजबळांना ओबीसी नेत्यांची साथ मिळत आहे. त्यातच त्यांनी एकीकडे ओबीसी नेत्यांना चुचकारतानाच सरकारला देखील सज्जड दम दिला आहे. त्यामुळे नेमके त्यांच्या मनात काय, असा प्रश्न उपस्थित होत होता.

त्यातच आता आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याजिल्ह्यात महायुती वातावरण निर्मिती करण्याच्या कामाला लागली असून, त्याच पार्श्वभूमीवर रविवारी राज्यात प्रत्येक लोकसभा मतदारसंघात महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातही महायुतीच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याला शिंदे गटाच्या शिवसेनेचे मंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे, भाजपच्या सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, देवयानी फरांदे, अजित पवार गटाचे नरहरी झिरवळ, सरोज अहिरे, दिलीप बनकर, नितीन पवार यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी या मेळाव्याकडे पाठ फिरविल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

कार्यकर्त्यांतील संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न

आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने महायुतीतील भाजपसह शिवसेना शिंदे गट आमि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात समन्वयासोबतच गैरसमज दूर करण्याच्या दृष्टीने जिल्ह्याजिल्ह्यात महायुतीच्या मेळाव्याचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. विशेषत: महायुती म्हणून एकजुटीचा संदेश देण्याच्या दृष्टीने आजचा मेळावा पार पडला. मात्र, महायुतीतील प्रमुख नेते छगन भुजबळच अनुपस्थित राहिल्याने वेगळीच चर्चा रंगली आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in