समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच; कारंजाजवळ झालेल्या अपघातात २ जणांचा मृत्यू

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उदघाटन केलेल्या समृद्धी महामार्गावर अपघाताच्या मालिका सुरुच असून ब्लॅक स्पॉट शोधण्यात येणार
समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच; कारंजाजवळ झालेल्या अपघातात २ जणांचा मृत्यू

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समृद्धी महामार्गाचे उदघाटन केले होते. यानंतर हा मार्ग सामान्यांसाठी खुला करण्यात आला. मात्र, काही दिवसांमध्येच या महामार्गावर अपघातांच्या बातम्याही समोर येऊ लागल्या. नुकतेच, वाशीममधील कारंजाजवळ झालेल्या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून २ जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे आता समृद्धी महामार्ग तर सुरु केला, पण नागरिकांच्या सुरक्षेचं काय? असा प्रश्न सामान्यांना पडला आहे.

आज पहाटे २ ते २.३०च्या दरम्यान एका चारचाकी गाडीचा अपघात झाला. भरधाव वेगामध्ये असलेल्या गाडीवरून चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात घडला. हा अपघात इतका भीषण होता की, गाडीतील लहान मुलगी गाडीबाहेर तब्बल १००-२०० फूट लांब फेकली गेली. हे सर्वजण नागपूरचे असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून इतर दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. त्यांना प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले आहे. रस्ते विकास महामंडळ आता यावरून सतर्क झाले असून समृद्धी महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी आता अपघातांचे ब्लॅक स्पॉट शोधण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in