
काही दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गाचे उदघाटन हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर अनेकदा अपघाताच्या घटना समोर आल्या. आज सकाळी या महामार्गावर एका गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये गाडीतील ६ प्रवाश्यांचा मृत्यू झाला. तर, तब्बल ७ प्रवासी गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बुलढाण्यातील मेहकरजवळ हा भीषण अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगाने असणारी गाडी उलटली. यामध्ये १३ प्रवासी प्रवास करत होते. त्यांच्यापैकी ६ जणांचा घटनास्थळी मृत्यू झाला तर इतर ७ प्रवासी गंभीर जखमी झाले. मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांमध्ये ४ महिला, १ लहान मूल आणि चालकाचा समावेश आहे. दरम्यान, स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले की अपघातानंतर तब्बल पाऊण तास मदत मिळाली नाही.