
बुलढाणा येथील समृद्धी महामार्गावर भीषण अपघातानंतर लागलेल्या आगीत २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. नागपूरहून पुण्याच्या दिशेने जात असताना बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळील पिंपळखुटा येथे हा अपघात झाला. यावर शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. “ समृद्धी महामार्गाला अनेकांनी शाप दिल्याने हा शापित महामार्ग झाला आहे, असे संजय राऊत यांनी व्यक्त केले. शनिवारी (आज) ते मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले.
ते म्हणाले की, "समृद्धी महामार्ग हा शापित महामार्ग बनला आहे. तो शापित का झाला ? याच्या खोलात जावे लागेल. तो महामार्ग करण्यासाठी सरकारने मनमानी कारभार केला. याबाबत अनेक गोष्टी आहेत. त्या भविष्यात समोर येतील, पण दुर्दैवाने त्या रस्त्यांवर वारंवार अपघात होतात, वारंवार मृत्यू होतात. हे चांगले नाही. “कितीवेळा श्रद्धांजली वाहायची. आम्ही अनेकदा समृद्धी महामार्गावर वेगमर्यादेची मागणी केली. त्यावर काहीच होत नाही. भ्रष्टाचारातून तो रस्ता तयार झाला आहे. त्या रस्त्यासाठी अनेकांच्या जमिनी हडपल्या गेल्या. जबरदस्तीने जमिनी घेतल्या गेल्या.